सध्या आयटी, ऑटोमोबाइल क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे. अनेक आयटी कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. गुगलसारखी दिग्गज कंपनीनेदेखील नुकतेच तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
बिझनेस इनसाडरच्या रिपोर्टनुसार गुगलमध्ये कार्यरत असणाऱ्या एका दाम्पत्यास नोकरीवरून काढले आहे, ज्यांना चार महिन्यांचे मूल आहे. गुगलमध्ये सहा वर्षांपासून कार्यरत असणारी एली आणि तिचा पती स्टीव्ह हादेखील दोन वर्षांपूर्वी कंपनीत रूजू झाला होता, हे दोघेही पालकत्व रजेवर होते. ते दोघेही कॅलिफोर्नियामध्ये स्थलांतरित झाले होते. मात्र गुगलने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय़ घेतला आणि त्या कर्मचाऱ्यांमध्ये या दोघांचाही समावेश असल्याचे समोर आल्याने, या दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.
गुगलमध्ये कर्मचारीच नाही तर चक्क एचआरलाही आपली नोकरी गमवावी लागली आहे. गुगलचे एचआर संभाव्य उमेदवाराशी नोकरीबाबत फोनवर बोलत असताना मध्येच फोन डिसकनेक्ट झाला आणि तेव्हा एचआरला समजलं की त्याचीच नोकरी गेली आहे.
सुंदर पिचाई यांनी घेतली जबाबदारी –
एका वर्षापूर्वीच गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गूगल खर्च कमी करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते. गूगलने ऑक्टोबर २०२२ मध्ये आर्थिक कमाई कमी झाल्याचे सुद्धा सांगितले आहे. गूगलचा नफा हा कमी होऊन १३.९ बिलियन डॉलरपर्यंत आला होता. हीच आकडेवारी पाहता १२ हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय गूगलतर्फे घेण्यात आला होता. कामावरुन कमी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे तसेच काही रक्कम (सेव्हरन्स पे) म्हणून देण्याचे वचन सुंदर पिचाई यांनी दिले आहे.