नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपचा वापर करणे एका कुटुंबाला भलतेच महागात पडले. गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण कारसह थेट पाण्याच्या मोठ्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूर येथे घडली. सुदैवाने, अग्निशामक दल आणि पोलिसांनी वेळीच धाव घेत तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

नेमकं काय घडलं?

दादनी येथील रहिवासी असलेला साहिल नावाचा तरुण रविवारी आपल्या कुटुंबासह कारने मेरठ येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे जात होता. प्रवासादरम्यान दिल्ली फाटक ओव्हरब्रिजजवळील रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे बंद करण्यात आला होता. त्यामुळे साहिलने पर्यायी मार्गासाठी गुगल मॅपची मदत घेतली. गुगल मॅपने त्यांना आनंद विहार योजना भागातून जाणारा एक पर्यायी रस्ता दाखवला.

रस्ता समजून कार नाल्यात घातली

या भागात पोहोचल्यानंतर मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे समोरील रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. साहिलला वाटले की हे नेहमीप्रमाणे साचलेले पाणी आहे, त्यामुळे त्याने कार पुढे नेली. मात्र, त्या साचलेल्या पाण्याच्या खाली एक मोठा आणि खोल नाला होता, जो साहिलला दिसला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने कार थेट त्या खोल नाल्यात जाऊन कोसळली.

इलेक्ट्रॉनिक सिस्टीम लॉक झाल्याने जीव टांगणीला

कार पाण्यात पडताच गाडीची इलेक्ट्रॉनिक सिस्टीम निकामी झाली. यामुळे कारचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जाम (लॉक) झाल्या. कुटुंबातील पाचही सदस्य कारच्या आत अडकले आणि त्यांचा जीव धोक्यात आला. गाडीत पाणी भरू लागल्याने आतमध्ये एकच खळबळ उडाली.

दोन तासांचे बचावकार्य

या कठीण प्रसंगात कुटुंबियांनी तात्काळ ‘डायल ११२’ वर फोन करून पोलिसांशी संपर्क साधला आणि मदतीची मागीतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. शेवटी जवानांनी कारच्या खिडक्या तोडून अत्यंत शिताफीने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पाचही जणांना सुखरूप बाहेर काढले.

मुख्य अग्निशामक अधिकारी अजय शर्मा यांनी सांगितले की, गुगल मॅपवर अवलंबून राहिल्यामुळे हे कुटुंब चुकीच्या मार्गावर गेले होते. तसेच परिसरात पाणी साचल्यामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे त्यांना नाल्याचा अंदाज आला नाही. सुदैवाने वेळेत मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर अनोळखी रस्त्यांवर गुगल मॅपचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.