Gujarat police arrested two men using Google Maps to track and rob remote temples : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एका मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेत एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मंदिरात चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ‘गुगल मॅप्स’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथितपणे गुगल मॅप्सचा वापर करून चोरी केल्याच्या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या चोरांना गुगल मॅप्सवरून मंदिरांचा शोध घेतला आणि नंतर त्या मंदिरांना लक्ष्य केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानसार, चोरीचे दागिने विकण्यासाठी राधनपूरला जात असताना पोलिसांनी गेडी येथील रहिवासी पंचभाई कोली आणि उमय्या येथील रहिवासी जावेद घांची यांना अटक केली. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.

मोती हमीरपर गावातील खोडीयार माता आणि रामापीर मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या मंदिरांमधून ११०१५० रुपये इतक्या किमतीचे दागिने लंपास करण्यात आले होते. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावला आणि दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

चोरी कशी करण्यात आली?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी घांची हा दुर्गम भागात असलेल्या मंदिरांचा शोध घेण्यासाठी ‘गुगल मॅप्स’चा वापर करायचा. एकादा का त्याने त्याचे लक्ष्य निश्चित केले की, हे दोघे रात्रीच्या वेळी त्या मंदिरात जात असत आणि नारळ सोलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीक्ष्ण लोखंडी हत्याराने कुलूप तोडत . त्यानंतर ते मौल्यवान वस्तू चोरून तेथून पळून जात.

पोलिसांनी सांगितले की, या दोघांना अटक झाल्यानंतर अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे. ज्यामध्ये सेलारी मंदिरात झालेल्या घटनेचाही समावेश आहे. हे दोघे इतरही अशाच घटनांमध्ये सहभागी आहेत का, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून चांदीची १४ छत्र्य़ा, चांदीसारख्या धातूचा एक साप, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेची किंमत सुमारे १० लाख रुपये इतकी आहे. याशिवाय, २२८१६० रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी जावेद घांची आणि पंचभाई कोली या दोघांविरोधात विविध कलांच्या अंतर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.