अग्रगण्य टेक कंपनी गुगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलची हाँगकाँग, तैवान आणि मेनलँड चाइनामधील सर्व कार्यालये बंद असणार आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील सरकारने नागरीकांना प्रवास टाळण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या सूचनेनुसार कंपनीने सर्व कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं गुगलच्या प्रवक्त्याने The Verge सोबत बोलताना सांगितले. याशिवाय कर्मचाऱ्यांना १४ दिवस घरुन काम करण्याची मूभाही देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचे चीनमध्ये थैमान –
कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून तेथे आतापर्यंत एकूण १३० हून अधिक जणांना मृत्यू झालाय. मध्य हुबेई प्रांतात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, विषाणूची लागण झालेल्या निश्चित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली असून पुढील दहा दिवसांत चीनमधील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ५९७४ रुग्णांच्या चाचण्या सकारात्मक आल्याचे म्हटले असून त्यांना कोरोना विषाणूने न्यूमोनिया झाला आहे. मंगळवारी एकूण ३१ प्रांतांत या विषाणूचा प्रसार झाल्याचे दिसून आले. एकूण १३२ लोकांचा यात बळी गेला असून हुबेई प्रांतात ३५५४ निश्चित रुग्ण आहेत. वुहान ही या प्रांताची राजधानी आहे. या प्रांतात एकूण १२५ बळी गेले आहेत. १२३९ रुग्ण गंभीर स्थितीत असून एकूण ९२३९ संशयित रुग्ण आहेत. हुबेई प्रांतात ८४० नवे रुग्ण सापडले असून विषाणू खूप वेगाने पसरत चालला आहे. जे लोक यात मरण पावले ते साठ वयावरचे आहेत. त्यांना आधीपासून इतरही काही रोग होते. मानवी संपर्कातूनही हा विषाणू पसरत असून या विषाणूचा प्रादुर्भाव दहा दिवसांत जास्त वाढणार असल्याचा इशारा श्वसन रोग तज्ज्ञ झोंग नानशान यांनी दिला आहे. चीनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय पथकाचे नानशान हे प्रमुख आहेत. लवकर निदान व वेगळे ठेवणे हे दोन मार्ग यावर सध्या उपयुक्त आहेत. ताप व अशक्तपणा ही लक्षणे या रोगात दिसत असून १० ते १४ दिवस रुग्णाला वेगळे ठेवणे गरजेचे आहे. २०१७ मध्ये वटवाघळात जे विषाणू सापडले होते तसाच आताचा विषाणू असून तो वन्य प्राण्यातून आलेला आहे. सिव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) हा रोग सहा महिने चालला होता पण आताचा न्यूमोनिया प्रसार तेवढा काळ राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. ५५ उपमार्गावरील केंद्रात लोकांचा ताप मोजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्याने आता भारतातही शिरकाव केल्याची चिन्हे आहेत. या जीवघेण्या विषाणूने होणाऱ्या आजाराची लक्षणं असलेले काही संशयित मुंबई आणि पुण्यात आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.