योगगुरू अय्यंगार यांना ‘गुगल’चे अनोखे अभिवादन

‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ने अय्यंगार यांना सन्मानित करण्यात आले होते.

अय्यंगार यांच्या जयंतीदिनी गुगलचे खास डुडल.

योगाचार्य दिवंगत बी.के.एस.अय्यंगार यांच्या ९७ व्या जयंती दिनानिमित्त गुगलने एका खास डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या डुडलमध्ये अय्यंगार यांचे अॅनिमेशन तयार करण्यात आले असून, गुगलच्या आद्यक्षरांच्या आकारातील योगासनं करताना दाखविण्यात आला आहे. गुगलचे हे खास डुडल नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

योगदीप !

अय्यंगार यांचा जन्म जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी बेल्लुर येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा पहिल्यांदा योगसाधनेशी संबंध आला. त्यांनी त्यांचे मेव्हणे तिरुमल्लाई कृष्णमाचार्य यांच्याकडून योगप्रशिक्षणाचे धडे घेतले. हे गुरुजींचे गुरू १०८ वष्रे जगले. नेपाळ-तिबेटच्या सीमेवर तिरुमल्लाई कृष्णमाचार्यानी एका तिबेटी लामाकडून दीक्षा घेतली होती.

देहवाद्याचा उपासक

१८व्या वर्षी गुरुजी योगसाधनेसाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर अय्यंगार यांनी योग क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. सरकारकडून अय्यंगार यांना सर्वप्रथम १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर २००२ मध्ये ‘पद्मभूषण’, तर २०१४ मध्ये ‘पद्मविभूषण’ने  त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सध्याचे योगविषयक तत्त्वज्ञान हे अय्यंगार गुरुजींच्या खांद्यावर उभे आहे. गुरुजींनी ‘बाबागिरी’ कधीही केली नाही. अष्टांगयोगाचे आजच्या काळाला साजेल असे पुनरुत्थान त्यांनी केले आणि लाखो लोकांना योग मार्गास लावले, रोगमुक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Googles animated doodle celebrates birth anniversary of yoga guru bks iyengar

ताज्या बातम्या