गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे यकृत फुटले आणि त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. मुंडे यांचे मंगळवारी नवी दिल्लीमध्ये अपघाती निधन झाले. मंगळवारी सकाळी सहा वाजता मुंबईकडे रवाना होण्यासाठी मुंडे आपल्या सहायकासोबत नवी दिल्ली विमानतळाच्या दिशेने जात असताना पृथ्वीराज मार्गावर त्यांच्या गाडीला इंडिका मोटारीने जोरदार धडक दिली. या अपघातात मुंडे जखमी झाले. त्यानंतर त्यांना लगेचच उपचारांसाठी नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचा श्वासोच्छवास चालू नव्हता. त्यांचा रक्तदाबही लागत नव्हता आणि ह्रदयक्रियाही बंद होती. डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर तातडीने आपत्कालिन उपचार सुरू केले. मात्र, त्यांच्या शरीराने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मुंडेंच्या मृत्यूचे कारण देण्यात आले असून, अपघातानंतर यकृत फुटले आणि त्यानंतर ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुंडेंचे निधन झाल्याचे त्यात म्हटले आहे.