२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या ‘नीट’ (NEET UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत कोणतंही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः टेलिग्रामसारख्या ॲप्सवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घातली आहे. कुठलाही गैरप्रकार, पेपरफुटी हे घडू नये यासाठी केंद्र सरकारने ही खबरदारी घेतली आहे. याआधी ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर हा टेलिग्रामवर ४८ तास आधी फुटला होता.

NTA च्या शिफारसींनुसार तात्पुरती बंदी

परीक्षेतील गैरप्रकारांवर मोठी कारवाई करत, केंद्र सरकारने देशभरात टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवर अधिकृतपणे बंदी घातली आहे. आगामी नीट (यूजी) २०२६ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पेपरफुटी आणि फसवणुकीचे रॅकेट रोखण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या NTA थेट शिफारशींनुसार ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. एनटीएने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्लॅटफॉर्मवर कठोर, कालबद्ध निर्बंध लागू करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९अ अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर केला आहे.

एडिटिंग सुविधा ३० जूनपर्यंत बंद

भारतातील टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक प्रवेश २२ जून २०२६ रोजी संपणाऱ्या एका निश्चित कालावधीसाठी पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. यामध्ये नीट (यूजी) पुनर्परीक्षेच्या आधीचे, परीक्षेदरम्यानचे आणि परीक्षेनंतरचे महत्त्वाचे दिवस थेट समाविष्ट आहेत. त्याचबरोबर टेलिग्रामला भारतातील पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व मेसेजसाठी एडिटिंग सुविधा ३० जून २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बंदीची कारणे आणि निर्देश

  • प्रश्नपत्रिका फुटणे (पेपर लीक) आणि परीक्षेशी संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली गेली आहेत. टेलिग्रामवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याची विनंती NTA नं केंद्राकडं केली होती.
  • भारतात टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक प्रवेश २२ जून २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ही बंदी NEET पुनर्परीक्षेच्या आधी, परीक्षेदरम्यान आणि त्यानंतरच्या काही दिवसांतही लागू राहील.
  • मेसेज एडिट (संपादन) सुविधा बंद: भारतात यापूर्वी पाठवलेल्या सर्व मेसेजेससाठी ‘एडिट’ करण्याची सुविधा ३० जून २०२६ पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षा माफियांद्वारे चालवल्या जाणाऱ्या टेलिग्राम चॅनेल आणि कॉपी करणाऱ्या टोळ्यांना (cheating rackets) लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली आहे.
  • परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर उपाययोजना केल्या आहेत. टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी ही तात्पुरती बंदी आवश्यक मानली जात आहे. विद्यार्थ्यांनी माहितीसाठी केवळ NTA च्या अधिकृत वेबसाइट आणि चॅनेलवरच अवलंबून राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
  • टेलिग्रामवरची बंदी केवळ NEET पुनर्परीक्षेच्या कालावधीपुरतीच लागू आहे; परीक्षेनंतर हा प्लॅटफॉर्म पुन्हा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मात्र, मेसेज एडिट करण्याची सुविधा ३० जूनपर्यंत बंद राहील. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि परीक्षेची निष्पक्षता या दृष्टीनं ही पावले अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. NTA आणि सरकारकडून सतर्कता वाढवण्यात आली असून, कोणत्याही अफवा किंवा गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

टेलिग्रामच्या ‘मेसेज एडिट’ फीचरवर बंदी का?

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये टेलिग्रामच्या ‘मेसेज एडिट’ या सुविधेचा अत्यंत पद्धतशीर आणि चुकीच्या मार्गाने वापर करण्यात आला. सायबर गुन्हेगार आणि पेपर लीक करणाऱ्या टोळ्या परीक्षा संपल्यानंतर जुन्याच मेसेजमध्ये फेरबदल (Edit) करत असत. परीक्षा संपल्यावर मूळ प्रश्नपत्रिका हाती येताच, ती जुन्या वेळेच्या मेसेजमध्ये समाविष्ट केली जायची. यामुळे सामान्य लोकांना आणि विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर लीक झाला होता, असा संभ्रम निर्माण होत असे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रचला जाणारा हा खोटा बनाव रोखण्यासाठी आणि अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठीच सरकारने थेट टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

NTA च्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय?

“देशभरातील लाखो नागरिक, तरुण आणि व्यावसायिक हे शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि वैयक्तिक संवादासाठी दैनंदिन जीवनात टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. या तात्पुरत्या बंदीमुळे सर्वसामान्य युजर्सना होणाऱ्या मनस्तापाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागलेल्या ‘नीट-युजी २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची विश्वासार्हता आणि पवित्रता जपण्यासाठी हे पाऊल उचलणे अत्यंत अनिवार्य होते.” हा निर्णय केवळ मर्यादित कालावधीसाठीच घेण्यात आला असून, २१ जूनची मुख्य फेरपरीक्षा सुरक्षित आणि चोख वातावरणात पार पडल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.२१ जूनच्या नीट परीक्षेची पारदर्शकता जपण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे.