रुग्णांकडून एक रुपया फी घेण्याऐवजी दोन रुपये घेतल्याने सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागली आहे. भाजपाचे आमदार या रुग्णालयाचा दौरा करण्यासाठी गेले होते. त्यांना हा प्रकार समजला. ज्यानंतर रुग्णालयातल्या या सरकारी कर्मचाऱ्याला खडे बोल सुनावले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली.

कुठे घडली आहे ही घटना?

उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयातली ही घटना आहे. भाजपा आमदार प्रेम सागर पटेल यांनी रुग्णालयाचा दौरा केला. त्यावेळी संजय नावाचा फार्मासिस्ट हा रुग्णांकडून एक रुपया जास्त घेत असल्याचं त्यांना कळलं. हा भ्रष्टाचार सुरु असल्याने कर्मचाऱ्याला त्यांनी झापलं आणि त्यानंतर या कर्मचाऱ्याला कामावरुन काढण्यात आलं. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की या फार्मासिस्टचं नाव संजय आहे. त्याला थर्ड पार्टीच्या एका एजन्सीद्वारे नियुक्त करण्यात आलं होतं. त्याचं निलंबन करण्यात आलं त्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं.

भाजपा आमदार प्रेम सागर पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल

भाजपा आमदार प्रेम सागर पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी फार्मासिस्ट संजयला चांगलंच झापलं. गरीब रुग्णांकडून तू एक रुपया वसूल करुच कसा काय शकतोस? मी स्वतः एका गावातून आलो आहे. मला माहीत आहे गरीबी काय असते? एक रुपयाऐवजी दोन रुपये वसूल करतोस? तुला लाज वाटत नाही का? असं म्हणत त्याला झापलं.