सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक लोकोपयोगी माहितीचे वितरण केले पाहिजे, असे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री (आणि केंद्रीय अर्थमंत्री) अरुण जेटली यांनी केले. मात्र तसे करताना त्यांनी प्रचारकी भूमिका घेऊ नये, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.
सरकारची संवादविषयक व्यूहरचना अधिक प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने राजधानीत नोकरशहांसाठी सोमवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी जेटली बोलत होते.नोकरशहा व मंत्र्यांनी जनतेशी योग्य प्रमाणात संवाद साधला पाहिजे. जनतेशी अगदीच फटकून वागून कोशात जाता कामा नये आणि त्याउलट प्रचारकी थाटातही वावरता कामा नये. लोकांना उपयोगी असलेल्या सरकारी योजनांची माहिती प्रभावीपणे वितरित केली पाहिजे, असे जेटली म्हणाले.