नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली असून यंदाच्या खरीप हंगामासाठी १७ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तिळाच्या हमीभावात सर्वाधिक ५२३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १० पिकांच्या हमीभावांमध्ये ३०० ते ५०० रुपयांची वृद्धी झाली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे केंद्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असून आठ वर्षांत केंद्राच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, यंदाही खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. यावर्षीही शेतकऱ्यांना पन्नास टक्के नफा मिळू शकेल, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. किमान आधारभूत किमतीमधील वाढीमुळे केंद्राच्या तिजोरीवर १.२६ लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकारने घेतले असून किसान सन्मान निधीद्वारे एकूण २ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. शिवाय, खतांवर २ लाख १० हजार कोटींचे अनुदानही देण्यात आले आहे, अशी माहितीही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. 

हमीभाव वाढलेली पिके

भात (सामान्य), भात (ए दर्जा), ज्वारी (हायब्रीड), ज्वारी (मालदांडी), नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सूर्यफूल बियाणे, सोयाबीन, तीळ, रामतीळ, कापूस (मध्यम धागा), कापूस ( लांब दागा) या पिकांवरील हमीभावात वृद्धी झाली आहे.

नफा ५० ते ८५ टक्के

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला असून ९ पिकांच्या हमीभावातील वाढीमुळे शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळू शकेल. अन्य पिकांमुळे हा नफा ५१ ते ८५ टक्क्यांपर्यंत मिळू शकेल.

३०० ते ५०० रुपयांची वाढ

दोन्ही प्रकारच्या भाताच्या पिकांच्या हमीभावात प्रति क्विंटल १०० रुपयांची वाढ झाली आहे. दोन्ही प्रकारच्या ज्वारीच्या पिकांत २३२ रुपयांची वृद्धी झाली आहे. बाजरी, नाचणी, मका व तूर या पिकांच्या हमीभावांमध्ये अनुक्रमे १००, २०१, ९२ व ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मूग. उडीद, भूईमूग, सूर्यफूल बियाणे, सोयाबीन, तीळ, रामतीळ, कापूस (मध्यम धागा), कापूस ( लांब दागा) या पिकांच्या हमीभावांमध्ये अनुक्रमे ४८०, ३००, ३००, ३८५, ३५०, ५२३, ३५७, ३५४ व ३५५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.