Iran VS Israel War : इराण आणि इस्त्रायलमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. इस्रायलने शुक्रवारी इराणवर हवाई हल्ले केले, त्यानंतर इराणनेही इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं. एवढंच नाही तर इस्रायलने इराणविरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ ही मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. यात इराणच्या काही नागरिकांचा मृत्यू देखील झाला, तर इराणनेही इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली.
दोन्ही देशांतील या संघर्षामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण-इस्रायल संघर्ष वाढल्याने भारताने अलर्ट होत तेथील आपल्या नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच इराणमधील भारतीयांबाबत भारतीय दूतावासांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने रविवारी या प्रदेशातील भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय दूतावासाने आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करून भारतीय नागरिक आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधू शकतात अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.
दरम्यान, इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर लगेच या आठवड्याच्या सुरुवातीला दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी करत सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
Advisory for all Indian nationals and Persons of Indian Origin currently in Iran. @MEAIndia @IndianDiplomacy pic.twitter.com/hACYKyaeId
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— India in Iran (@India_in_Iran) June 15, 2025
दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात काय म्हटलं?
“इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता सर्व भारतीय नागरिक आणि इराणमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याची व सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याची आणि दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे अनुसरण करण्याची व स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असं दूतावासाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.