नवी दिल्ली : मुलांना लक्ष्य करून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुलांचे आरोग्य आणि पोषण यासंबंधी लाभांचे खोटे दावे करण्याच्या प्रकाराला आळा घालणे आणि त्यांना भेटवस्तूचे प्रलोभन दाखवून वस्तू आणि सेवा घेण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकाराला प्रतिबंध करण्याची यामध्ये तरतूद आहे.

ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंध आणि जाहिरातींसंबंधी आवश्यक सतर्कतेसाठी यंदा मार्गदर्शक तत्त्वे  जारी केली आहेत. मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींसंबंधी  १९ तरतूदी आहेत. त्या तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या शिफारशीनंतर मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी  तरतूदी  आहेत, असे सिंह यांनी सांगितले.