बंगळूरु : कर्नाटकमधील विद्यमान राज्य सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असून हे सरकार ४० टक्के दलाली घेत कारभार करीत असल्याचा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून १५० जागांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले. येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी आयोजित केलेल्या काँग्रेसचे खासदार, आमदार आणि अन्य नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राहुल यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली.  

राहुल  म्हणाले की, भाजपकडून गरिबांकडील पैसा काढून घेतला जात असून तो मोजक्या अतिश्रीमंत उद्योगपतींच्या खिश्यात घातला जात आहे. भाजपचा सध्या हाच उद्योग सुरू आहे. पंतप्रधान भ्रष्टाचाराबद्दल बोलतात, पण ते जर कर्नाटकात येऊन भ्रष्टाचाराबाबत बोलू लागले तर लोक त्यांच्यावर हसतील. कारण कर्नाटकमधील सरकार हे ४० टक्के दलाली घेणारे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. ते पुढे म्हणाले की, देशातील बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. देशातले हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. भाजपची इच्छा असली तरी ते लोकांना रोजगार देऊ शकत नाहीत, कारण त्यांनी देशातील रोजगारनिर्मीतीची क्षेत्रेच नष्ट केली आहेत, असा आरोप राहुल यांनी केला.   

कोट..

कर्नाटकात आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने किमान १५० जागांवर उमेदवार निवडून आणले पाहिजेत. त्यासाठी लोकांच्या प्रश्नांनर एकजुटीने लढले पाहिजे. शिवाय (उमेदवारीसाठी) गुणवत्ता हाच निकष असला पाहिजे. आपण महिला आणि युवकांवर लक्ष केंद्रित करून संघटना आणि तिकीटवाटपातही त्यांना प्राधान्य दिले पाहिजे.

-राहुल गांधी, काँग्रेसनेते