नवी दिल्ली : पेगॅसस हेरगिरीप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून यातील स्पायवेअर हे सरकारनेच खरेदी केल्याची शक्यता ठामपणे वर्तवली आहे. त्यांनी हे वक्तव्य इस्रायली राजदूतांच्या वक्तव्याआधारे केले आहे.

इस्रायलची एनएसओ ही संस्था खासगी आस्थापनांना स्पायवेअरची विक्री करीत नाही असे राजदूतांनी म्हटले आहे. याचाच अर्थ हे स्पायवेअर सरकारने खरेदी केले असा होत असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याप्रकरणी चौकशी करण्याकरिता स्वतंत्र तज्ज्ञ समिती नेमली आहे. यात सरकारने इस्रायली स्पायवेअरचा गैरवापर केला किंवा नाही याचा शोध घेतला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणावरही पाळत ठेवण्याचा मुक्त परवाना सरकारला नाही. या स्पायवेअरच्या प्रकरणात आपण मूक प्रेक्षक बनू शकत नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

चिदंबरम यांनी म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शहाणपणाचा व धाडसी आहे, त्यामुळे या प्रकरणातील पहिला सांगाडा बाहेर पडला आहे.

काल इस्रायलच्या राजदूतांनीही एनएसओ समूह हे स्पायवेअर कुठल्याही देशाच्या सरकारलाच विकते, खासगी आस्थापनांना विकत नाही  असे म्हटले आहे. त्यामुळे हे स्पायवेअर भारत सरकारनेच खरेदी केले असा त्याचा अर्थ होतो, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

पेगॅसस सॉफ्टवेअर भारत सरकारने खरेदी केले हे दूरसंचार मंत्री मान्य करणार का, असा सवालही त्यांनी केला आहे. जर सरकार यावर शांत राहिले तर तो सरकारच्या प्रगती पुस्तकातील एक ठपका असेल असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.

एनएसओ किंवा तत्सम कंपन्यांना निर्यात परवाना असावा लागतो. कुठल्याही देशाच्या सरकारला निर्यात करायची असेल तरच हा परवाना दिला जातो, असे इस्रायलचे नवनियुक्त राजदूत नाओर गिलोन यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले,की एनएसओ सारख्या कंपन्यांना त्यांची उत्पादने बिगर सरकारी आस्थापनांना विकता येत नाहीत.