देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याचे विधेयक सरकार संसदेच्या या अधिवेशनात आणण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
जलवाहतूक आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळेच सरकारने हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत मंत्रिमंडळाने टिप्पणी तयार केली असून, या अधिवेशनात हे विधेयक सादर करण्याचा प्रयत्न असेल असे गडकरी यांनी स्पष्ट केले. या नद्यांचे जलमार्गात रूपांतर केल्यास वाहतूक दृष्टीने अधिक स्वस्त ठरेल असा दावा गडकरींनी केला. रेल्वे वाहतुकीसाठी प्रति किमी १ रुपया, रस्ते वाहतुकीस दीड रुपया इतका खर्च येतो. मात्र जलवाहतुकीस प्रति किमी ३० पैसे इतका खर्च येत असल्याने ही योजना फायदेशीर ठरेल असा दावा त्यांनी केला. मात्र या कडे विशेष लक्ष दिले नसल्याची खंत गडकरींनी व्यक्त केली.