scorecardresearch

करोना लसीच्या बूस्टर डोससाठीच्या कालावधीत कपात, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे.

covid-vaccine-1200-4-3
करोना लसीकरण

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे. आधी दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोससाठी ९ महिने किंवा ३९ आठवडे थांबावं लागत होतं. मात्र, या नव्या निर्णयानुसार दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यात किंवा २६ आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारची सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (NTAGI) केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, “१८ ते ५९ वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना करोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी किंवा २६ आठवड्याने खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस देता येईल.”

“६० वर्षांवरील लाभार्थ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यात येईल,” असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.

सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात ४ कोटी ७५ लाख बुस्टर डोस देण्यात आले आहेत. यात ५७ लाख ७५ हजार आरोग्य कर्मचारी, १ कोटी ५ लाख फ्रंटलाईन वर्कर्स आणि २ कोटी ५० लाख ६० वर्षांवरील वयोगटाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

विश्लेषण : पाच ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी वापरास परवानगी मिळालेली ‘Corbevax’ लस कशी कार्य करते?

भारतात १० जानेवारी २०२२ रोजी बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. यात गंभीर असणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करचा समावेश होता. यावेळी केंद्र सरकारने बुस्टर डोस घेण्यासाठी दुसऱ्या डोसनंतर किमान ९ महिन्यांच्या अंतराची अट ठेवली.

१० एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षांवरील सर्वांसाठी बुस्टर डोस देण्याची घोषणा करण्यात आली. या वयोगटासाठी बुस्टर डोस खासगी लसीकरण केंद्रावर घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यासाठी नागरिकांना शुल्कही आकारण्यात आलं. या काळात १८ ते ४४ वयोगटातील ३३ लाख ९९ हजार नागरिकांनी, तर ४५ ते ५९ वयोगटातील २७ लाख ७६ हजार नागरिकांनी बुस्टर डोस घेतले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Government reduces gap for covid 19 vaccination booster dose pbs

ताज्या बातम्या