कांदा उत्पादकांना चांगल्या दराची आशा
निर्यातीस प्रतिबंध ठरणारी कांद्याची किमान निर्यात किंमत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात १० रुपये किलो भावाने कांदे विकावे लागण्याची वेळ आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात चांगला दर मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.
परकीय व्यापार संचालनालयाने यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी केली. कुठल्याही विक्रेत्याला किमान निर्यात किमतीच्या खाली आपला माल विकता येत नाही. मागील हंगामात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या किमतींनी अस्मान गाठले होते. त्या पाश्र्वभूमीवर कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी निर्यातीवर अंकुश लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यासाठी कांद्याचे दर प्रतिटन ४२५ अमेरिकन डॉलरवरून ७०० डॉलपर्यंत नेण्यात आले होते.
त्यानंतर कांद्याचे चांगले उत्पादन झाल्यावर कांद्यासाठी असलेली किमान निर्यात किंमत रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली होती. कांद्याचे भाव प्रतिकिलोमागे १० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी विनासायास निर्यातीची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू होते. डिसेंबरच्या सुरुवातीला हे दर प्रतिटन ७०० डॉलरवरून ४०० डॉलपर्यंत आणण्यात आले. राष्ट्रीय फळबाग संशोधन आणि विकास संस्थेच्या आकडेवारीनुसार, सध्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा १० ते १४ रुपये किलोने विकला जात आहे. ऑगस्टमध्ये हाच दर प्रतिकिलोमागे ५७ रुपये इतका होता.