चित्रपटगृहांमध्ये आणि आकाशवाणीवरून छोटेखानी माहितीविषयक कार्यक्रम सादर करून माहितीचा अधिकार कायद्याबाबतची जनजागृती मोहीम हाती घेण्याचे सरकारने ठरविले आहे.या प्रकारच्या छोटेखानी कार्यक्रमांसाठी जवळपास १०५ आकाशवाणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण, बीपीएल कार्ड आणि पंचायतींबाबत माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करण्याबाबत आकाशवाणी वाहिन्या छोटे कार्यक्रम सादर करीत आहेत, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी सदर विभाग हा मुख्य प्राधिकरण म्हणून काम करीत आहे.
त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार कायद्याशी निगडित जनजागृती लघुपट सादर करण्याचे अधिकार ४९२ चित्रपटगृहांना देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या हिंदी भाषक राज्यांमधील ६२५ आसनक्षमता असलेल्या चित्रपटगृहांमध्ये लघुपट दाखविले जाणार आहेत. सदर लघुपट ६० सेकंदांपासून ते दोन मिनिटांपर्यंतच्या कालावधीचे आहेत.