ललित मोदी प्रकरणात स्थगन प्रस्ताव मांडताना कॉंग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मोदीगेट’ शब्द वापरल्याने लोकसभेमध्ये बुधवारी मोठा गदारोळ उडाला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हा शब्द वापरण्याला हरकत घेतली. त्याचवेळी कामकाजातून हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र, स्थगन प्रस्तावामध्ये हा शब्द वापरण्यास मंजुरी देणार असाल, तरच आम्ही तो मांडण्यास आणि त्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. या नंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तहकूब केले. दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेस सदस्यांना चर्चा करायची आहे की त्यापासून पळायचे आहे, अशा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
तत्पूर्वी ललित मोदी प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची केंद्र सरकारने तयारी दर्शविली. सुषमा स्वराज आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या प्रस्तावावर चर्चा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून तातडीने या विषयावर चर्चा घेण्याची कॉंग्रेस सदस्यांची मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावली. त्यामुळे पुन्हा कॉंग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर सुमित्रा महाजन यांनी विविध सदस्यांकडून आलेले कामकाज स्थगन प्रस्ताव फेटाळले. मात्र, त्यानंतर लगेचच सुषमा स्वराज यांनी स्वतःहून निवेदन करताना, मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेला प्रस्ताव अध्यक्षांनी स्वीकारावा आणि चर्चा सुरू करावी, अशी विनंती अध्यक्षांकडे केली. व्यंकय्या नायडू यांनीही त्याला होकार दिला. सरकारने या प्रस्तावावर चर्चा करण्यास होकार दिल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात बोलावण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनीच खुलासा देणे आम्हाला मंजूर नाही, असे मत त्यांनी मांडले. यावर सरकारकडून कोणतेच उत्तर देण्यात आले नाही.
कामकाजात स्थगन प्रस्तावावर प्रश्नोत्तराच्या तासानंतरच चर्चा घेण्यात येऊ शकते, असा नियम असल्याचे अध्यक्षांनी विरोधकांना सांगितले. सभागृहातील सर्व सदस्य स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार असतील, तर माझी कोणतीही हरकत नाही. पण प्रश्नोत्तराच्या तासानंतरच चर्चा घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.