चीनमधून उगम पावलेल्या करोनारुपी राक्षसानं बघता बघता संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं. करोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर काही रुग्णांना करोनावर मात केल्यानंतर गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं आहे. त्यातच करोनाचे घातक व्हेरिएंट समोर येत आहेत. त्यामुळे अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. करोनाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी हत्यार आहे. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर नियमावली पाळल्यास करोना रोखण्यास मदत होणार आहे. आता करोनावरील लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. करोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात प्रभावशाली असल्याचं आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं.

“मृत्यूदर रोखण्यासाठी लसीचा एक डोस ९६.६ टक्के प्रभावशाली आहे. तर दोन डोसनंतर त्याचा प्रभाव ९७.५ टक्क्यांपर्यंत वाढतो”, असं आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी करोना दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

गेल्या २४ तासांत देशामध्ये ४३ हजार २६३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ९३ हजार ६१४ झाली आहे. आत्तापर्यंत देशातल्या तीन कोटी ३१ लाख ३९ हजार ९८१ नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४० हजार ५६७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी २३ लाख ४ हजरा ६१८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात ३३८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा आता चार लाख ४१ हजार ७४९ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत ८६ हजार ५१ लाख ७०१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ७१ कोटी ६५ लाख ९७ हजार ४२८ झाली आहे.