देशातील अनुसूचित जाती आणि जमातीतील तरुणांना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि खासदार सीताराम येचुरी यांनी गुरुवारी केली. संविधान दिनानिमित्त तीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
अनुसूचित जाती आणि जमातीसाठी याआधी करण्यात आलेल्या कायद्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची वेळ आली आहे. या कायद्यात बदल करून अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण ठेवण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आली पाहिजे. केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार या कायद्यामुध्ये बदल करणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांना खासगी क्षेत्रात आरक्षण मिळवून देण्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यास भाजप सरकार तयार होईल का, असेही त्यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.