वंदे मातरम बाबत जमियतचे प्रमुख अर्षद मदानी यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आम्हाला वंदे मातरम म्हणण्याबाबत किंवा ते वाचण्याबाबत कुठलाही आक्षेप नाही. पण मुसलमान हा फक्त अल्लाहला मानतो, तो इतर कुणालाही मानत नाही इतर कुठल्या देवाची प्रार्थना करत नाही. आपल्या पठणात कुठलाही मुसलमान हा फक्त अल्लाहलाच समाविष्ट करतो इतर कुणालाही नाही.

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण, अर्षद मदानी नेमकं काय म्हणाले?

वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ८ डिसेंबर २०२५ ला या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत चर्चा सुरु केली होती. आता या विषयावर राज्यसभेतही चर्चा सुरु होऊ शकते. दरम्यान अर्षद मदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अर्षद मदानी म्हणाले, “वंदे मातरम हे गीत म्हणायला आमचा काही आक्षेप नाही. मात्र या गीतामध्ये देशाला देवी मानून, दुर्गा देवीशी देशाची तुलना करण्यात आली आहे. चार श्लोकांवर आधारीत हे गाणं आहे या गाण्यामध्ये पूजा करण्यासंबंधीच्या शब्दांचा अंतर्भाव आहे. मां मै तेरी पूजा करता हूँ. असा वंदे मातरमचा अर्थ आहे. ही बाब धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधातली आहे. मुसलमान माणूस अल्लाहला मानतो आणि त्याचीच प्रार्थना करतो. त्यामुळे हे अनुच्छेद २५ म्हणजेच धार्मिक स्वातंत्र्य आणि अनुच्छेद १९ म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावरचा हल्ला आहे.” असं अर्षद मदानी यांनी म्हटलं आहे.

देशावर प्रेम असणं आणि पूजा करणं हे दोन्ही वेगळे भाग

अर्षद मदानी पुढे म्हणाले देशावर प्रेम असणं हा एक भाग आहे, देशाची पूजा करणं हा वेगळा भाग आहे. मुसलमान हा त्याच्या आस्था सांभाळतो, तो त्याच्या आस्थेच्या विरोधात जाऊन हे गीत कसं काय म्हणेल? त्याला ते गाणं म्हणण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही असंही मदानी यांनी म्हटलं आहे. दरम्यान वंदे मातरमवर झालेल्या विशेष चर्चेत भाग घेताना AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी असं म्हटलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं कारण आपण देश आणि धर्म एकत्र केला नाही. सरकारने वंदे मातरम म्हणण्यासाठी कुणावरही सक्ती करु नये. तसं केल्यास ती संविधानाच्या विरोधातली कृती होईल. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नव्हता असे लोक आता आम्हाला देशप्रेम शिकवत आहेत असाही टोला ओवैसींनी सरकारला लगावला होता. त्यानंतर आता मदानी यांचं वक्तव्य समोर आलं आहे.