“पेट्रोल २०० रुपये लिटर झाल्यावर बाईकवरुन ट्रिपल सीट प्रवासाला परवानगी मिळेल”; भाजपा नेत्याचं वक्तव्य

मोफत लस दिल्यामुळे इंधन भडका झाला म्हणणं किंवा इंधनाचे दर वाढलेत तर सायकल चालवा अशी वक्तव्य यापूर्वी भाजपा नेत्यांनी केलीयत

Fuel Price
यापूर्वीही भाजपा नेत्यांनी अशाप्रकारची वक्तव्य केलेली आहेत. (प्रातिनिधिक फोटो)

इंधनदरवाढ हा सध्या देशातील ज्वलंत विषय आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. मागील २० दिवसांमध्ये तब्बल १५ वेळा इंधनदरवाढ झालीय. या इंधनदरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. इंधनाचे दर कमी होण्याची सध्या तरी काही चिन्हं दिसत नाहीयत. या इंधनदरवाढीबद्दल सर्व सामान्यांमध्ये चिंतेचा स्वर उमटताना दिसत आहे. मात्र ही दरवाढ योग्य किंवा अनिवार्य असल्याचे खुलेसा करताना सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते वाटेल ती स्पष्टीकरणं देत आहेत.

तालिबानला दोष देणं, मोफत लस दिल्यामुळे इंधन भडका झाला म्हणणं किंवा इंधनाचे दर वाढलेत तर सायकल चालवा ती आरोग्यासाठी फायद्याची असते असा युक्तीवाद करण्याचे प्रकार भाजपा नेत्यांनी केले आहेत. मात्र आता याच अजब युक्तीवादामध्ये आणखीन एका विचित्र वक्तव्याची भर पडलीय. ही भर पाडणारा नेता आहे, आसामचे भाजपाचे अध्यक्ष.

आसाम भाजपाचे अध्यक्ष भाबेश कालिता यांनी पेट्रोलच्या दरांसंदर्भात भाष्य करताना अजब दावा केलाय. पेट्रोलचे दर २०० रुपये लिटरच्या पुढे गेल्यास ट्रीपल सीट प्रवास करण्याची मूभा आसामध्ये देण्यात येईल असं म्हटलंय. “पेट्रोलचे दर लिटर मागे २०० रुपयांवर पोहचल्यानंतर दुचाकी गाड्यांवर तिघांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच एका बाईकवर तीन जणांना प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारकडून सहमती घेण्यात येईल. दुचाकी वाहनांवर तीन जणांची बसण्याची सोय असणाऱ्या गाड्या निर्माण करण्याची परवानगीही घेता येईल,” असं कालिता म्हणालेत. मात्र कालिता यांनी केलेलं हे वक्तव्य गांभीर्याने केलं की मस्करीमध्ये केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्याच्या कायद्यानुसार दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

ऑक्टोबरमध्ये १५ वेळा वाढले दर…
ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत १५ वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. मागील तीन दिवस आणि इतर दोन दिवस वगळल्यास रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये पेट्रोल ४.४५ रुपयांनी महाग झालं आहे तर डिझेल पाच रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होताना दिसतोय.

या राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार…
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, दिल्ली, ओदिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. मेट्रो शहरांपैकी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र सरकार आकारत असणाऱ्या करांबरोबर प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या कराची टक्केवारी वेगळी असल्याने वेगवेगळ्या राज्यांमधील दर वेगवेगळे असतात. भारत हा जगामधील सर्वाधिक इंधन वापरणाऱ्या देशांपैकी आहे. देशातील इंधनाच्या गरजेपैकी ८५ टक्के गरज ही आयात केलेल्या तेलामधून भागवली जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Govt will allow tripling on bikes when petrol price crosses rs 200 says assam bjp leader scsg

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या