Greater Noida: घराच्या छतावरुन पडल्याने २४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ग्रेटर नोएडा येथून समोर आली आहे. इकोटेक-३ परिसरात ही घटना घडली. मृत महिलेच्या कुटुंबियांनी मात्र, सासरच्या लोकांनी मुलीला मारहाण करुन घराच्या छातावरून फेकून दिल्याचा आरोप केला आहे. हुंड्यासाठी नवरा आणि सासरच्या मंडळीकडून छळ सुरु होता असाही आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी माध्यमांना दिली.

धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप

दीपिका असे या मृत महिलेचे नाव असल्याचे समोर आले आहेय दीपिका मूळची बदलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुडी खेरा गावची रहिवासी होती. जलपुरा गावचा रहिवासी हृतिक नावाच्या व्यक्तीबरोबर तिने दीड वर्षांपूर्वी लग्न केले होते. दीपिकाच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत, असा आरोप तिचे काका विशेष यांनी केला आहे. धारदार शस्त्र ब्लेड किंवा स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने तिच्या अंगावर वार केल्याची शंका काकांंनी व्यक्त केली आहे, अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.

हुंड्यात फॉर्च्युनरची मागणी?

“असं काही घडेल याचा आम्ही विचार देखील केला नव्हता. माझा मोठा भाऊ घरी जाऊन आला, माघारी आल्यानंतर लगेच त्याला ती (दीपिका) खाली पडल्याचा फोन आला. भावांनी मुलगी कुठे पडली विचारले देखील पण, समोरुन काही उत्तर मिळाले नाही. त्यांनी केवळ ती खाली पडल्याचे सांगितले आणि शारदा रुग्णालयात यायला सांगितले. आम्हाला देखील वाटले की किरकोळ जखम झाली असेल”, असे काका विशेष म्हणाले. दीपिकाचा नवरा आणि सासरच्यांनी हुंड्यात फॉर्च्युनरची मागणी केल्याचा आरोपही विशेष यांनी केला आहे.

मारहाण करुन खाली फेकले – काकांचा आरोप

सासरच्या मंडळींनी दीपिकाला मारहाण केली आणि अपघात भासविण्यासाठी तिला घराच्या छतावरुन खाली फेकून दिले, दीपिकाच्या हत्येमागे हुंड्याचा संशय विशेष यांनी व्यक्त केला आहे. आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. पण, तिच्या शरीरावर वार केल्याचे निशाण दिसत होते. ब्लेड, स्क्रू ड्रायव्हर किंवा यासरख्या वस्तूच्या मदतीने खोल वार केल्याचे दिसून आले. मारहाण केल्यानंतर तिला छतावरुन खाली फेकल्याचा आरोप विशेष यांनी केला आहे.

रविवारी घडलेली ही घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी मृत दीपिकचा पती हृतिक आणि सासरे मनोज यांना अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.