रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र ग्रेटर नोएडातील बीना कुमारी गंगवार यांनी आपल्या भावाला मूत्रपिंड दान करून या नात्याला वेगळाच अर्थ दिला आहे. ४५ वर्षीय बीना यांनी आपला ४० वर्षीय धाकटा भाऊ जितेंद्र सिंह गंगवार याला मूत्रपिंड दान करून त्याला नवजीवन दिले. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
जितेंद्र सिंह गेल्या अडीच वर्षांपासून दीर्घकालीन मूत्रपिंड आजाराने त्रस्त होते आणि आठवड्यातून तीन वेळा त्यांना डायलिसिस घ्यावे लागत होते. त्यांच्यावर ग्रेटर नोएडातील शारदा केअर-हेल्थसिटी येथे एबीओ-सुसंगत मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि युरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. अनिल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बीना आणि जितेंद्र दोघांचीही प्रकृती आता चांगली आहे.
‘माझ्या बहिणीने मला नवे जीवन दिले’
डायलिसिसमुळे जितेंद्र यांच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता. मात्र या काळात बीना त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभ्या राहिल्या. उपचारासाठी जितेंद्र बाहेर असताना त्यांनी त्यांच्या मुलांचीही काळजी घेतली. “माझी बहीण आयुष्यभर माझी ताकद राहिली आहे. आज तिने तिचे मूत्रपिंड देऊन मला नवे जीवन दिले. तिने माझे प्राण वाचवले, यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत” असे जितेंद्र यांनी सांगितले. तसेच “माझ्या बहिणीने डायलिसिससाठी बाहेर असताना माझ्या मुलांची काळजी घेतली. आता तिने मला नवे जीवन दिले आहे. मला आता तिच्यासाठी सर्व काही करायचे आहे”, असेही ते म्हणाले. जितेंद्र यांना पाच वर्षांचा मुलगा आणि एक लहान मुलगी आहे. बहिणीबरोबर त्यांचे नाते आधीपासूनच घनिष्ठ होते. मात्र या प्रत्यारोपणामुळे त्यांचे नाते आणखी घट्ट झाल्याचे ते म्हणाले.
‘हा त्याग नाही, बहिणीचे प्रेम आणि कर्तव्य आहे’
भावाला डायलिसिसच्या त्रासातून जाताना पाहिल्यानंतर मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेणे बीना यांच्यासाठी कठीण नव्हते. “माझ्या भावाला डायलिसिसचा त्रास सहन करताना पाहिले, तेव्हा मूत्रपिंड दान करणे मला त्याग वाटला नाही. बहीण म्हणून माझ्या प्रेमाची आणि कर्तव्याची ती स्वाभाविक भावना होती,” असे बीना यांनी सांगितले. बीना अविवाहित असून कुटुंबीयांनी त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. दोन्ही भावंडे एकत्र राहतात. भावाला पुन्हा निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळाली, याचाच आपल्याला सर्वाधिक आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
“मला रडू येत होते. माझ्या भावाला नवे आयुष्य मिळाले, एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे. तो आता नव्या आयुष्याची सुरुवात करतोय, याचा मला आनंद आहे,” असे त्या म्हणाल्या.
उपचारादरम्यान कुटुंबाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. मात्र योग्य वेळी मदत मिळाल्याने उपचार पुढे सुरू ठेवता आले, असे बीना यांनी सांगितले.
जितेंद्र यांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार
जितेंद्र यांना प्रत्यारोपणानंतर संसर्गापासून विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. स्वच्छता राखणे, मास्क वापरणे आणि संसर्गापासून दूर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच त्यांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार आहेत. जर स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर प्रत्यारोपित मूत्रपिंडही निकामी होऊ शकते, असे जितेंद्र म्हणाले.
डॉक्टर म्हणाले ‘तिच्या धैर्याने त्याला जीवन दिले’
शारदाकेअर-हेल्थसिटीचे मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि युरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. अनिल शर्मा यांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. “औषधोपचारांनी आम्हाला साधन दिले, पण तिच्या धैर्याने आणि निष्ठेने त्याला जीवन दिले,” असे डॉ. शर्मा म्हणाले.
नेफ्रोलॉजी विभागाचे संचालक डॉ. कुणाल राज गांधी यांनी योग्य रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणामुळे दीर्घकाळच्या डायलिसिसपासून मुक्त होऊन जीवन सुधारण्यास मदत करू शकते, असे सांगितले. युरोलॉजी आणि केटीपी विभागाचे संचालक डॉ. अहमद कमाल यांनीही दाता आणि रुग्ण दोघांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले.
नेफ्रोलॉजी विभागाचे संचालक डॉ. कुणाल राज गांधी यांनी सांगितले की, प्रत्यारोपण योग्य रुग्णांना दीर्घकालीन डायलिसिसपासून मुक्त होण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करू शकते. युरोलॉजी आणि केटीपी विभागाचे संचालक डॉ. अहमद कमाल यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर दाता आणि रुग्ण या दोघांचीही प्रकृती चांगली सुधारली आहे.
बहिणीने त्यांना आपल्या मुलांबरोबर आणखी काही वर्षे जगण्याची संधी दिली आहे. आता उरलेले आयुष्य बहिणीची काळजी घेण्यात घालवायचे, एवढीच जितेंद्र यांची इच्छा आहे.
