वृत्तसंस्था , जेरुसलेम
पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्यासह इतर कार्यकर्त्यांबरोबर गाझा पट्टीत मदत घेऊन येणारी बोट इस्रायलने सोमवारी जप्त केली आणि सर्वांना ताब्यात घेतले.
थनबर्ग यांच्यासह १२ कार्यकर्ते मॅडलीन या बोटीवर होते. ताब्यात घेतलेले सर्व जण आपापल्या देशात जातील आणि त्यांनी आणलेली मदत गाझा पट्टीमध्ये पोहोचवली जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलने गाझा पट्टीमध्ये केलेल्या कोंडीला वाचा फोडण्यासाठी ‘फ्रीडम फ्लोटिला’ या आघाडीची स्थापना झाली आहे. या आघाडीच्या मॅडलीन या बोटीतून थनबर्गसह इतर कार्यकर्ते गाझा पट्टीकडे निघाले होते. ही बोट गेल्या रविवारी सिसिली बेटावरून निघाली. इस्रायलने गाझा पट्टीची केलेली सागरी कोंडी फोडून तेथील नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न याद्वारे होणार होता. येथील संकटाला त्यातून वाचा फोडली जाणार होती. पॅलेस्टिनी भूभागाची नौदलाने केलेली कोंडी कुणालाही फोडू देणार नाही, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिला होता.