१६ वर्षीय ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना त्यांच्याच शब्दात सुनावले; म्हणाली, “शांत व्हा आणि…”

मतमोजणी थांबवण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीवर ग्रेटाचा सडेतोड रिप्लाय

फोटो सौजन्य : रॉयटर्स

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जवळजवळ निश्चित आहे. मतमोजणी सुरु असून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपण पिछाडीवर पडत असल्याचे दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये धावही घेतली, पण जॉर्जिया आणि मिशिगन मधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना सणसणीत टोला लगावला आहे. ट्विटवरुन ग्रेटाने ट्रम्प यांना त्यांच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. शांत व्हा आणि एखादा चित्रपट पाहा आणि रागावर नियंत्रण मिळवण्यावर थोडं काम करा असा चिमटा ग्रेटाने काढला आहे.

“हे खूपच हस्यास्पद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या रागावर नियंत्रण न ठेवता येण्याच्या समस्येवर थोडं काम केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी आपल्या एखाद्या मित्राबरोबर छानसा जुना चित्रपट पहावा. शांत व्हा ट्रम्प.. शांत व्हा,” असं ट्विट ग्रेटाने केलं आहे. ग्रेटाने हे ट्विट ट्रम्प यांच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतृत्वामधील स्विंग स्टेट्समध्ये मतमोजणी थांबवण्यासंदर्भात ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटवर उत्तर देताना केला आहे.

ट्रम्प यांनी या निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा दावा केला असून मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी ग्रेटाला डिसेंबर महिन्यामध्ये ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवले होते. त्यावेळी जगभरातील अनेकांनी ग्रेटाचे अभिनंदन केलं होतं.  मात्र जागातील सर्वात शक्तीशाली देश असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना या निर्णय फारसा आवडला नव्हता. त्यावेळी त्यांनी ग्रेटाला रागावर नियंत्रण मिळवल्यासंदर्भात सल्ला दिला होता. ट्रम्प यांनी ट्विटवरुन ग्रेटावर निशाणा साधताना तिला शांत होत एखाद्या मित्राबरोबर चित्रपट पाहण्याचा सल्ला दिलेला.

१६ वर्षीय ग्रेटाने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये  हवामान बदल थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे संघात हवामान कृती परिषदेसंदर्भात केलेलं वक्तव्य चांगलचं गाजलं होतं. या परिषदेला आलेल्या जगभरातील नेत्यांवर ग्रेटा संतापली होती. “पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी माझं बालपण हिरावून घेतलं आहे,” असा आरोप ग्रेटा थनबर्गने केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Greta thunberg mocks donald trump with his own words in twitter revenge scsg

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या