तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेतील एकमेव बचावलेल्या व्यक्तीचं नाव वरुण सिंग असून ते ग्रुप कॅप्टन आहेत. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते.

एक वर्षापूर्वी वरुण सिंग उड्डाण करत असलेल्या एका लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या सिस्टीममध्ये बिघाड झाला होता, परिणामी त्यांनी एअरक्राफ्टवरील नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मात्र, मोठ्या हिमतीने त्यांनी विमान उतरवण्यात यश मिळवले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२ रोजी फ्लाइट कंट्रोल सिस्टीम  आणि प्रेशरायझेशन सिस्टममधील (लाइफ सपोर्ट एनवायरमेंट कंट्रोल सिस्टीम) मोठ्या सुधारणांनंतर, ते त्यांच्या बेसपासून दूर एलसीएमध्ये सिस्टम चेक सॉर्टी उडवत होते. यावेळी जास्त उंचीवर गेल्यानंतर कॉकपिटचा दबाव कमी झाला. सिंग यांनी लगेच परिस्थिती ओळखली आणि लँडिंगसाठी कमी उंचीवर उतरण्यास सुरुवात केली. पण खाली उतरताना, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम अयशस्वी झाली आणि त्यांनी विमानावरील संपूर्ण नियंत्रण गमावले. अशा अत्यंत जीवघेण्या परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक तणावात असतानाही, सिंग यांनी संयम राखत विमानावर नियंत्रण मिळवले होते. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी स्वातंत्र्यदिनी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा – “लँडिंगच्या ८ मिनीट आधी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला”, गृहमंत्र्यांनी लोकसभेतील निवेदनात सांगितला घटनाक्रम!

हेही वाचा – “हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते, त्यांनी हळू आवाजात नाव सांगितले”; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा