पृथ्वीवरील दिनमानाच्या कालावधीत वाढ

पृथ्वीच्या ध्रुवांवर असलेल्या हिमनद्या वितळत असून त्यामुळे सागरी जलपातळी वाढत आहे.

परिभ्रणाचा वेग मंदावल्याचा परिणाम
पृथ्वीच्या ध्रुवांवर असलेल्या हिमनद्या वितळत असून त्यामुळे सागरी जलपातळी वाढत आहे. परिणामी पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावला असून त्यामुळे दिनमानाचा कालावधी वाढत आहे, तो १.७ मिलिसेकंदांनी वाढला असला तरी त्याचा संकलित परिणाम विचारात घेतला तर तो जास्त असू शकेल, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
सागरी जलपातळीत भूतकाळात झालेले फरक अभ्यासून आगामी काळाबाबत हवामान बदलांचे भाकित करण्यासाठी संशोधन करण्यात आले असून त्यात पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत चालल्याचे निदर्शनास आले आहे. कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मॅथ्यू डमबेरी यांनी सांगितले की, गेल्या शतकातील सागरी पातळीतील बदलांचा अभ्यास क रताना पृथ्वीच्या गाभ्याच्या गतिशीलतेचाही विचार करण्यात आला. हिमनद्या वितळल्याने सागरी जलपातळी वाढते व त्यामुळे पृथ्वीचे वस्तुमान ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे सरकते त्यामुळे परिभ्रमणाचा वेग कमी होतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावानेही पृथ्वीचा वेग मंदावतो. असे असले तरी केवळ या दोन कारणांमुळेच पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावतो असे नाही तर पृथ्वीच्या गाभ्यातील गतिशील परिणामांचा त्यात समावेश असावा.

गेल्या तीन हजार वर्षांत पृथ्वीचा गाभा थोडा वेग घेतो आहे, तर वरच्या कवचाचा वेग मंदावतो आहे. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग अधिक मंदावतो. त्यामुळे दिनमान १.७ मिलिसेकंदांनी वाढले आहे. हे प्रमाण फार मोठे नाही, पण दूरगामी विचार केला तर त्याचा परिणाम जास्त आहे. वैज्ञानिकांच्या मते २१ व्या शतकाच्या अखेरीस सागरीपातळी काय असेल याचा अंदाज करता येऊ शकतो. हवामान बदलाशी सामना करताना आपण अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत गुंतवणुकीचा विचार करीत असून किनारी भागतील शहरांसाठी ती गुंतवणूक अधिक असली पाहिजे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Growth in day period of the earth