वस्तू आणि सेवा कर समितीने (जीएसटी) अनेक उत्पादनांवरील करांच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा देताना समितीने ट्रॅक्टरच्या सुट्या भागांवर लावण्यात आलेला २८ टक्के कर कमी करून तो १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी निर्णयांची माहिती दिली. कॉम्प्युटर प्रिंटरवरील कर २८ वरून १८ टक्क्यांवर तर काजूवरील कर १८ वरून १२ टक्क्यांवर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी (दि. १८) समितीची पुढील बैठक होईल अशी माहितीही जेटली यांनी दिली.
GST rate on insulin reduced from 12% to 5 %; rate on school bags reduced from 28% to 18% : FM Arun Jaitley #GST pic.twitter.com/qIM8SWL4OM
— ANI (@ANI_news) June 11, 2017
चित्रपटाच्या १०० रूपयांहून कमी दर असलेल्या तिकिटांवर २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. १०० रूपयांहून अधिकच्या तिकिटांवरील २८ टक्के कर कायम राहील, असे जेटली यांनी सांगितले. त्याचबरोबर टेलिकॉम सेक्टरवर १८ टक्के कर कायम ठेवण्यात येणार आहे. टेलिकॉम जगतातील प्रतिनिधींनी करामध्ये सवलतीची मागणी केली होती.
कटलरीवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के कर लागू होणार आहे. इन्सुलिनवरील प्रस्तावित करही १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. स्कूल बॅगवरील प्रस्तावित २८ टक्के कर घटवून तो १८ टक्क्यांवर आणला आहे. उदबत्तीवरील १२ टक्के कर ५ टक्क्यांवर नेला आहे.
सॅनिटरी नॅपकिनबाबत जेटलींना विचारण्यात आले असता त्यांनी या बदलांव्यतिरिक्त अन्य वस्तूंवरील प्रस्तावित करात कोणताच बदल केला नसल्याचे सांगितले. आम्हाला १३३ वस्तूंवरील जीएसटी दरात बदलाची शिफारस करण्यात आली होती. यावर चर्चा केल्यानंतर ६६ वस्तूंवरील कर दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.