पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाऊंटवरून महाराष्ट्रातील जनतेला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या या खास मुहूर्ताच्या शुभेच्छा. आगामी वर्ष तुमच्यासाठी आनंदी, निरोगी आणि भरभराटीचे ठरो, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील अनेक भागांमध्ये उत्साह दिसत आहे. यंदाही मुंबई, ठाणे आणि डोंबिवली परिसरातील शोभायात्रा गुढीपाडव्याचे आकर्षण ठरणार आहेत. काहीवेळाच या शोभायात्रांना सुरूवात होईल. याशिवाय, अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाडव्याच्या निमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सिद्धीविनायकाच्या काकड आरतीला हजेरी लावत भाविकांनी मराठी नववर्षाचं स्वागत केले. आज सकाळी ८ वाजून २७ मिनीटांनी श्री. शालिवाहन शके १९३९ हमलंबीनाम संवत्सचारा प्रारंभ होऊन नूतन वर्ष सुरु होईल. दरम्यान, पुढच्यावर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर म्हणजे १८ मार्च २०१८ रोजी येणार असल्याचं खगोल अभ्सासकांचे म्हणणे आहे.

मुंबईसह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात महारांगोळी साकारण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त या महारांगोळीत त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत. २५ महिला आणि २० पुरुष कलाकारांनी मिळून २८ तासांमध्ये ही रांगोळी साकारली. गणेश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठेतही गेल्या काही दिवसांपासून लगबग पाहायला मिळत आहे. शहरातील दुकाने साखर गाठींनी सजली असून नोटाबंदीदरम्यान ठप्प पडलेल्या बाजारपेठा पुन्हा तेजीत येईल, असे चित्र आहे.