करोनाचा प्रादुर्भाव जगातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवरही झालाय. माऊंट एव्हरेस्टवर कमीत कमी १०० हून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. गिर्यारोहक आणि त्यांच्या साथीदारांना करोनाची लागण झाल्याचा दावा एका गाइडने केला आहे. मात्र करोना रुग्ण आढळल्याचा गाईडचा दावा नेपाळ सरकारने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गाइड खरं बोलतोय की नेपाळ सरकार काही लपवतंय याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

ऑस्ट्रियाचे लुकास फुरटेनबॅक यांनी करोनाचं संकट पाहता गेल्या आठवड्यात आपलं एव्हरेस्ट अभियान स्थगित केलं आहे. एक परदेशी गाइड आणि ६ नेपाळी शेरपा गाइड यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. करोनाची लागण झालेल्या लोकांचा आपल्याकडे रिपोर्ट असल्याचंही फुरटेनबॅक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपण पुराव्यानिशी ही बाब बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. “शिबीरात काही जण आजारी पडले आहेत. तर काही जण खोकत असताना दिसत आहेत. त्यामुळे बेस कॅम्पमध्ये कमीत कमी १०० जणांना करोनाची लागण झाल्याचं दिसत आहे”, असंही लुकास फुरटेनबॅक यांनी सांगितलं.

ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता यल्लो फंगसचा धोका; उत्तर प्रदेशात आढळला पहिला रुग्ण

एव्हरेस्ट चढण्यासाठी नेपाळ सरकारने आतापर्यंत ४०८ गिर्यारोहकांना परवानगी दिली आहे. कॅम्पमध्ये शेरपा गाइड आणि सहकारी त्यांच्या मदतीसाठी आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच चीन मार्गे होणारी एव्हरेस्टवरील चढाई बंद करण्यात आली आहे. चीनने गिर्यारोहकांना परवानगी नाकारली आहे. त्यानंतर नेपाळनेही गिर्यारोहकांवर बंदी घातली होती. मात्र काही काळापूर्वी ही बंदी नेपाळने उठवली.

Covid 19: कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही ६० वर्षांपर्यंत कुटुंबाला मिळणार वेतन; टाटांचा स्तुत्य निर्णय

जगात करोनाची साथ पसरल्यानंतर नेपाळमध्ये आतापर्यंत ५ लाख १३ हजार २४१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ लाख ९१ हजार ३४८ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १ लाख १५ हजार ५४७ सक्रीय रुग्ण आहेत. नेपाळमध्ये करोनामुळे आतापर्यंत ६ हजार ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे.