Gujarat Ahmedabad Murder Case Crime News : गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःप्रमाणे मुलगाही ‘भोवा’ म्हणजेच धार्मिक विधी करून लोकांवर उपचार करण्याचा दावा करणारा व्यक्ती बनू नये, या कारणातून एका पित्याने आपल्या १० वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर मुलाची हत्या केल्यानंतर तो त्याच्या मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३६ वर्षीय नरेश पटेल याला अटक केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

नरेश हा अहमदाबाद जिल्ह्यातील विंछिया गावात राहतो. तो स्वतःला ‘भोवा’ म्हणवून घेत असून, या प्रथेत सहभागी असलेले लोक धार्मिक विधींद्वारे देवी-देवतांना आवाहन करत असल्याचा दावा करतात. नरेशचा मुलगा करण (वय १०) याची त्याने घराच्या अंगणातील मंदिरात हत्या केल्याचा आरोप आहे.

देवघरातील वेदीवर मुलाचे डोके आपटले

नरेशची पत्नी भारती पटेल हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ती घरी परतली असता नरेश मुलाच्या मृतदेहाशेजारी खाटेवर झोपलेला दिसला. मुलाची हत्या देवघरात करण्यात आल्याचे तिने सांगितले. भारतीच्या जबाबानुसार, नरेशने मुलाला पायांनी पकडून देवीच्या वेदीवर तीन वेळा आपटले. त्यानंतर काठीने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या केली. पुढे मुलाचा मृतदेह खाटेवर ठेवून नरेश त्याच्याच शेजारी झोपला. सणंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एल. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेशने मुलाचे डोके मंदिरातील वेदीच्या कडेला आपटले आणि त्यानंतर काठीने मारहाण करून त्याची हत्या केली. मंदिरातील जोगणी माता देवीच्या वेदीवर मुलाच्या रक्ताचे डागही आढळले.

पत्नी दहा दिवसांपासून माहेरी; मुलगा परीक्षेमुळे घरीच थांबला

नरेशने मारहाण केल्यामुळे भारती सुमारे दहा दिवसांपूर्वी साणंद येथील माहेरी राहायला गेली होती. मात्र, परीक्षा असल्यामुळे मुलगा करण वडिलांसोबत घरीच थांबला होता. १ नोव्हेंबर रोजी नरेशने मुलाला बेदम मारहाण केल्याची माहिती भारतीला मिळाली. एका शेजाऱ्यानेही पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर अहमदाबाद ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नरेश घरातील खाटेवर झोपलेला होता आणि त्याच्या शेजारी मुलाचा मृतदेह होता.

‘माझ्यानंतर कुटुंबात कोणीही भोवा होऊ नये’

पोलिसांत दाखल एफआयआरनुसार, भारतीने नरेशला मुलाची हत्या का केली, असा जाब विचारला असता त्याने धक्कादायक उत्तर दिले. “माझे वडील भोवा होते आणि त्यांच्यानंतर मी ही भूमिका स्वीकारली. आता या कुटुंबात माझ्यानंतर दुसरे कोणीही भोवा होऊ नये, म्हणून मी करणला पायांनी पकडून वेदीवर आपटले आणि काठीने मारून त्याची हत्या केली,” असे त्याने सांगितल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.

पोलिसांनी नरेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे प्रथमदर्शनी वाटत असून, त्याची मानसशास्त्रीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक चौहान यांनी दिली. परिसरातील शेजाऱ्यांशीही नरेशचे संबंध चांगले नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.