scorecardresearch

गुजरात विधानसभेची लढाई दिल्लीच्या विधानसभेत; केजरीवाल सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

गुजरात विधानसभा निवडणुकीची लढाई गुरुवारी दिल्ली विधानसभेत लढली गेली.

गुजरात विधानसभेची लढाई दिल्लीच्या विधानसभेत; केजरीवाल सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
दिल्ली सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या आमदारांनी आनंद व्यक्त केला.

राज्य सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची लढाई गुरुवारी दिल्ली विधानसभेत लढली गेली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर ‘सीबीआय’ने केलेल्या कारवाईचा आम आदमी पक्षाला राजकीय लाभ झाला असून गुजरातमध्ये ‘आप’च्या मतांमध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत केला.

गुजरातमध्ये वर्षअखेरीला विधानसभेची निवडणूक होणार असून भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘आप’ने प्रचाराला वेग दिल्यानंतर भाजप आणि आप यांच्यामध्ये राजकीय संघर्षही तीव्र झाला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या हाताने २ टक्के मते आमच्या झोळीत टाकली आहेत’, असा दावा केजरीवाल यांनी केला.

भाजपने ‘आप’च्या आमदारांना पक्षातून फोडण्याचा प्रयत्न केला असून महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही कमळ मोहीम राबवण्याचा घाट घातल्याचा आरोप ‘आप’कडून केला गेला. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण फोल ठरल्याचे सिद्ध करण्यासाठी दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’ सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला व तो गुरुवारी संमत करून घेतला. एकही आमदार फोडण्यात भाजपला यश आले नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. विश्वासदर्शक ठरावाच्या उत्तरामध्ये केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष आव्हान दिले.

‘सिसोदियांवर कारवाई केल्यापासून ‘आप’च्या मतांमध्ये ४ टक्के वाढ झाली असून सिसोदियांना अटक होईल, तेव्हा आणखी दोन टक्के मते तरी वाढतील. समजा सिसोदियांना दोनदा अटक झाली तर, कदाचित गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन होईल’, असे केजरीवाल विधानसभेत म्हणाले.

दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणात बदल केल्यामुळे राज्य सरकारचे आर्थिक नुकासन झाले आहे. मद्यधोरणातील बदलामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला असून ‘सीबीआय’ने यासंदर्भात सिसोदियांच्या निवासस्थानी छापेही टाकले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये आप विरुद्ध भाजप अशी लढाई रंगली आहे. दिल्लीचे नवे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी ‘सीबीआय’ चौकशीचा आदेश दिल्यामुळे ‘आप’ने त्यांच्याविरोधातही मोहीम सुरू केली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे सक्सेना यांनी ‘आप’विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील या सर्व मुद्दय़ांवर केजरीवाल गुजरातमधील प्रचारसभांमध्ये बोलत आहेत. भाजप दिल्लीमध्ये ‘आप’वर अन्याय करत असल्याचा आरोप केजरीवाल गुजरातमध्ये करत असून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच दिल्ली विधानसभेत बोलताना केजरीवाल यांनी पंतप्रधानांनी गुजरातमधील मते ‘आप’च्या झोळीत टाकल्याचे विधान केल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली विधानसभेत ७० सदस्य असून आपकडे ६२ संख्याबळ आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी आपच्या ५८ आमदारांनी ठरावा पाठिंबा दिला, २ सदस्य परदेशात असून सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. गोंधळ घातल्याबद्दल भाजपच्या सदस्यांना निलंबित करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gujarat assembly battle delhi assembly kejriwal prime minister votes aap ysh

ताज्या बातम्या