हर्दीक, अल्पेश, जिग्नेशची अपेक्षित पकड नाही

गुजरातमधील ४.३३ कोटी मतदारांपैकी २.२४ कोटी मतदार ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. राज्यातील पुढील सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहेत याबद्दल तरुण मतदारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. यामध्ये त्यांनी आरोग्य, शिक्षण,आरक्षण या मुद्दय़ांना प्राधान्य दिले आहे.

यंदा गुजरात निवडणूकांमध्ये हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मवानी हे तरुण चेहरे प्रामुख्याने समोर आले. तर युवा मतदारांवर छाप पाडण्यात  हे नेते असमर्थ ठरले असल्याचे दिसून येत आहे. समाजमाध्यमांतून त्यांची मोठी चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात चर्चा केल्यावर युवकांना ते फार काही करून दाखवतील असे वाटत नाही असाच सूर आहे.

‘‘ या तथाकथित युवा नेत्यांना भारताला भविष्यात महासत्ता म्हणून पुढे नेण्यात काही रस नसून ते पारंपारिक जातीच्या मुद्दय़ांवर अडखळले आहेत, असे पीएडीचा विदय़ार्थी आणि ‘मचान’ या नाटय़कंपनीचा संस्थापक हर्ष शोधन याने सांगितले.

राज्सशास्त्राची विदय़ार्थीनी प्रियल ठक्कर हिने राजकारणात अधिकाधिक युवांनी भाग घेण्याची आवश्यकता आहे. कला शाखेची विदय़ार्थीनी नीतू मिश्रा हिने गुजरातमध्ये भाजप किंवा कॉँग्रेसपैकी कोणाचेच सरकार नको असल्यामुळे आपण ‘नोटा’चा पर्याय निवडणार असल्याचे सांगितले. गुजरातच्या निवडणूकांमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणात जातीचे राजकारण याआधी कधी झाल्याचे मला आठवत नाही, राहुल गांधी जातीच्याआधारे मतदार वळविण्याचा प्रयत्न करित असून त्यापेक्षा भाजपच्या विकासाच्या मुद्दय़ाला आपला पाठिंबा असल्याचे इंजिनिअिरगचा विदय़ार्थी ‘हृषी भिमानी याने सांगितले. तर प्रकाशनाचा व्यवसाय करणऱ्या विरल शाहने पुढील सरकारने उत्तम दर्जाच्या शिक्षणाकडे लक्ष देत पारदर्शक प्रशासनावर भर दिला पाहिजे, त्याचप्रमाणे तरुणांसाठी अधिकाधिक संधी देत त्यांनाही राजकारणात सामील करण्यासाठी निर्णय घ्यायला हवेत, असे सांगितले.  सत्तेवर आल्यावर सरकारने सर्वप्रथम आरक्षणाचा मुद्दा सोडवावा असे शीतल पंडय़ा हिने सांगितले.