गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २०१६ पासून आतापर्यंत १,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यापैकी २०२१ मध्येच ९०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. या पाच वर्षाच्या काळात एटीएसने अमली पदार्थाशी संबंधित काही मोठ्या प्रकरणांमध्ये ७० हून अधिक लोकांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या चार वर्षांपासून पाकिस्तानातील तस्कर गुजरातच्या किनारपट्टीचा वापर अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी ट्रान्झिट मार्ग म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर्षी विविध कारवायांमध्ये ९०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये मोरबी जिल्ह्यातून रविवारी जप्त केलेल्या ६०० कोटी रुपयांच्या १२० किलो प्रतिबंधित ड्रग्जचा समावेश आहे, जो एका पाकिस्तानी तस्कराने पाठवला होता आणि समुद्रमार्गे गुजरातच्या किनारपट्टीवर आणला होता. २०१६ पासून एटीएसने हेरॉईन, मॅन्ड्रेक्स, मेथॅम्फेटामाइन (किंवा एमडी), चरस आणि ब्राऊन शुगरसह विविध अंमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त केलेल्या ड्रग्जचे वजन २,२४२ किलो आहे आणि जागतिक बाजारपेठेत त्याची अंदाजे किंमत १,९२३ कोटी रुपये आहे.

एटीएसच्या आकडेवारीनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये, एटीएसने, भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, गुजरात किनार्‍याजवळील अरबी समुद्रात इराणी मासेमारी बोटीने आणलेले १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन जप्त केले. त्यानुसार एटीएसने गेल्या वर्षी १७७ कोटी रुपये, २०१९ मध्ये ५२६ कोटी रुपये, २०१८ मध्ये १४ कोटी रुपये आणि २०१६ मध्ये ३०३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते.

एटीएसच्या माहितीनुसार २०१७ मध्ये कोणताही मोठा प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही. गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक (ऑपरेशन्स) हिमांशू शुक्ला यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानी ड्रग्ज सिंडिकेट गुजरातच्या किनारपट्टीचा वापर तस्करीच्या उद्देशाने ट्रान्झिट मार्ग म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे सर्व प्रयत्न राज्य पोलीस आणि तटरक्षक दल आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी हाणून पाडले आहेत.

“गुजरात पोलिस आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी असे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत आणि भविष्यातही असा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असे ते म्हणाले. एटीएस, आयसीजी आणि सागरी पोलिसांनी समुद्रात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. गुजरातला १,६०० किमीचा समुद्रकिनारा आहे, त्यामुळे हे साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करतात.