scorecardresearch

मेधा पाटकर या शहरी नक्षलवादी; गुजरातच्या भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका

आम आदमी पक्षाने पाटकर यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून तिकीट दिले होते.

मेधा पाटकर या शहरी नक्षलवादी; गुजरातच्या भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका
सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर (संग्रहित छायाचित्र)

अहमदाबाद : गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांचा उल्लेख ‘शहरी नक्षलवादी’ असा केल्याने वाद निर्माण झाला आहे. मेधा पाटकर या कट्टर गुजरातविरोधी व्यक्ती असून गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष मेधा पाटकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून वापर करणार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

आम आदमी पक्षाने पाटकर यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. हाच धागा पकडून पाटील म्हणाले. ‘‘आम आदमी पक्षाने अशा एका व्यक्तीला लोकसभेचे तिकीट दिले, जिने कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशातील नागरिकांना नर्मदेच्या पाण्यापासून सुमारे १५ वर्षे वंचित ठेवण्याचे पाप केले,’’

हेही वाचा >>> नितीश कुमार सोनिया गांधींना भेटणार ; म्हणाले, “गरज पडल्यास आम्ही…”

पाटकर यांनी एका कार्यक्रमात असे सांगितले होते की, सरदार सरोवर धरण कधीच पूर्ण होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे. हा प्रकल्प रखडवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. जेव्हा धरण पूर्ण झाले, त्या वेळी त्यांनी कच्छ आणि सौराष्ट्र या भागांत पाणी पोहोचण्यापासून रोखण्याची शपथ घेतली होती, असा आरोप पाटील यांनी केला.

दरम्यान, आम आदमी पक्षाने मात्र पाटील यांच्या आरोपाचे खंडन केले असून गुजरातमधील सत्ताधारी भाजप हा पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.

गेल्या आठवडय़ात गुजरातच्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा उल्लेख ‘शहरी नक्षलवादी’ असा केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gujarat bjp chief calls medha patkar urban naxal zws

ताज्या बातम्या