Gujarat DySP Car Accident updates: आनंद जिल्हा पोलिसांनी गुरुवारी बोटाद जिल्ह्याचे कार्यरत उपअधीक्षक (DySP) ए. ए. सय्यद यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे आणि वेगाने गाडी चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सय्यद यांनी त्यांच्या भरधाव स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) ने आनंद जिल्ह्यातील अडस गावातील एका हायवे हॉटेलजवळील उसाच्या रसाच्या स्टॉलशेजारी उभे असलेल्या लोकांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

ही घटना गुरुवारी दुपारी घडली. सय्यद वडोदराहून परतत होते आणि वडोदरा-अहमदाबाद महामार्गावरील अडस पुलाजवळ आपली गाडी चालवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, DySP यांच्या लाल रंगाच्या SUV वरील नियंत्रण सुटले आणि ती चार जणांवर जाऊन धडकली. हे लोक वडोदराजवळील एका मंदिराचे दर्शन घेऊन अहमदाबादला परतत असताना हायवेवरील हॉटेलपाशी थांबले होते.

उसाचा रस काढण्याचे मशीन ४० फूट दूर उडाले

पोलिसांनी सांगितले की, मृत आणि जखमी व्यक्ती मूळचे राजस्थानमधील बांसवाडा येथील असून सध्या अहमदाबादमधील मणिनगर येथे राहत होते. त्यांनी या धार्मिक यात्रेसाठी दोन गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. या सर्वांनी अडस पुलाजवळील ‘राजवी हॉटेल’मध्ये दुपारच्या जेवणासाठी मुक्काम केला होता. जेवण आटोपून तीन पुरुष आणि एक महिला रस्त्याच्या कडेला उभे असतानाच अचानक एका भरधाव वाहनाने त्यांच्या दिशेने वळण घेतले आणि त्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, उसाचा रस काढण्याचे मशीन घटनास्थळापासून तब्बल ४० फूट दूर घासटत गेले आणि त्याचे पूर्णपणे तुकडे झाले.

उपाअधीक्षकांनी पळून जाण्याऐवजी रुग्णवाहिकेसाठी फोन केला

या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वासड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. के. डोडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोडिया म्हणाले, “DySP स्वतः कार चालवत होते आणि या अपघातात ते स्वतःही जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर ते गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी हॉटेल मालकाकडे फोन मागितला. अपघातात त्यांचा स्वतःचा फोन खराब झाल्यामुळे त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला आणि रुग्णवाहिकेला फोन केला. तसेच स्वतःची ओळख सांगून आपला अपघात झाल्याची माहिती दिली.

“भारतीय न्याय संहितेच्या तरतुदींनुसार, सय्यद यांनी अपघातस्थळावरून पळ काढला नसल्यामुळे हा गुन्हा जामीनपात्र प्रवर्गात येतो, असे डोडिया यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “आम्ही एफआयआर नोंदवला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सय्यद जखमी असल्याने आनंद कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील डॉक्टरांनी त्यांना वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात पाठवले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते बरे झाल्यानंतर आम्ही त्यांचा जबाब नोंदवू.”