गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग; राज्यपालांसोबत बैठकीनंतर विजय रुपाणींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!

राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

Gujarat CM Vijay Rupani resigns as CM

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष असणार आहे.

पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. “जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. आता मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन. आम्ही त्याला पद नाही जबाबदारी नाही म्हणतो. मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणुका लढतो आणि २०२२च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील,” असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.

२६ डिसेंबर २०१७ रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून रुपाणी आणि उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली होती.

विजय रूपाणी आणि पक्ष संघटनेमध्ये मतभेद

विजय रूपाणी आणि पक्ष संघटनेमध्ये बरेच दिवस मतभेद सुरू होते असे म्हटले जात होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत त्यांचे मतभेद होते. गेल्या वर्षीच भाजपाने रूपाणींविरोधात पक्षाला अहवाल दिला होता. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची पकड सैल होत असल्याचेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे होते. कामाबाबत रूपाणी सरकारची प्रतिमा कमकुवत होत होती.

गुजरात सरकारमधील नेतृत्व बदलण्याची चर्चा आणि राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमधील नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरु होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक अहमदाबादला पोहोचले होते. त्यांच्या गुजरात भेटीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समिती अध्यक्ष हितेश बारोट विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले होते. गुरुवारी रात्री अमित शहा आपल्या बहिणीच्या घरी गेले असले तरी ते कौटुंबिक कामानिमित्त आले असावेत असे वाटत होते. पण आता विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर अमित शाह हे कदाचित सत्ताबदलाच्या संदर्भातच गुजरातमध्ये आले होते अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gujarat cm vijay rupani resigns as cm abn

ताज्या बातम्या