Gujarat Congress Vande Mataram Row : राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे सहा कडवी गाण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचं दिसून आलंय. गुजरात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वंदे मातरमच्या पहिल्या दोन कडव्यानंतर काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला खाली बसले. मात्र, काँग्रेसचे उर्वरित आमदार राष्ट्रीय गीत संपेपर्यंत उभे होते. १८२ सदस्यांच्या या सभागृहात काँग्रेसचे अवघे १२ आमदार आहेत. राष्ट्रीय रगीत गायले जात असताना गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित चावडा किंवा कार्याध्यक्ष जिग्नेश मेवाणी या दोघांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

खेडावाला यांच्यावर कारवाईची मागणी

खेडावाला यांच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेत सत्ताधारी भाजपाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांची भेट घेऊन नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस कार्य समितीने १९ ऑगस्ट रोजी एका ठरावाद्वारे पक्षीय आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये या गीताची केवळ पहिली दोनच कडवी गायची, या आपल्या १९३७ च्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. गेल्या वर्षी, वंदे मातरमच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, संसदेने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या तोडीस तोड वैधानिक संरक्षण देणारे विधेयक मंजूर केलं. भाजपाने राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये या गीताची सर्वच्या सर्व सहा कडवी गायचा ठराव मंजूर केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसच्या भूमिकेविषयी विचारलं असता, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तुषार चौधरी म्हणाले, “खाली बसणे ही त्यांची (खेडावाला यांची) वैयक्तिक भूमिका होती. ते का खाली बसले, हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. यामध्ये पक्षाच्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. आम्ही पहिल्या रांगेत उभे होतो आणि मागे काय घडलं याची आम्हाला कल्पना नाही.” दरम्यान, कॅबिनेट मंत्री ऋषिकेश पटेल आणि जितू वाघानी यांचा समावेश असलेल्या भाजपा आमदारांच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष चौधरी यांची भेट घेऊन खेडावाला यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली.

परंपरेचं उल्लंघन झालं

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना संसदीय कामकाज मंत्री ऋषिकेश पटेल म्हणाले, “आमच्या टीमने अध्यक्षांना सांगितलं की, विधानसभा स्थापन झाल्यापासून सभागृहात वंदे मातरम गायलं जातं. मुद्दा असा आहे की, आता या गीताची सर्व कडवी गाणं बंधनकारक आहे. विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याने ते गायलं पाहिजे. आज परंपरेचं उल्लंघन झालं आहे. इम्रानभाई उभे राहिले नाहीत. ही घटना सभागृहात घडली आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई झाली पाहिजे.”

“दुसरं म्हणजे, ते (खेडावाला) काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून सभागृहात बसतात. त्यामुळे काँग्रेसने या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी आमची मागणी आहे. तुम्ही (काँग्रेस) त्यांच्याशी सहमत आहात की नाही? मुद्दा माफीचा नाही. हा शिष्टाचाराप्रमाणे गायनादरम्यान शिस्तीत उभं राहण्याचा मुद्दा आहे. त्यांनी या शिष्टाचाराचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर जी काही लागू असणारी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, ती केली जावी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करून काय करता येईल ते पाहू, असे अध्यक्षांनी आम्हाला सांगितले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना वाघानी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाने वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप केला. आपल्या बाजूने बोलताना, सभागृहातील एकमेव मुस्लिम आमदार असलेल्या खेडावाला यांनी सांगितलं, “गांधीजी, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या नेत्यांनी गायलेल्या या गीताच्या वेळी मी उभा होतो. या गीतात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कडव्यांच्या गायनादरम्यान मी खाली बसलो. गेली ७० वर्षे आपण जे गीत गात आलो आहोत, तेच गीत मी गायलं.”

मला काँग्रेसच्या विचारसरणीची देणंघेणं…

“मी काँग्रेसच्या विचारसरणीचं पालन करतो. आमचे वंदे मातरम हे १९३७ मधीलच आहे… काय करायचे हे निवडण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे. तिथे सक्ती असू शकत नाही. मी खाली बसलो आणि ती माझी वैयक्तिक भूमिका होती. मला काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी देणेघेणे आहे, आरएसएस आणि भाजपाच्या विचारसरणीशी नाही. त्यांनी मला विधानसभेतून बाहेर काढले तरी मी यासाठी माफी मागणार नाही. मी काहीही चुकीचं केलेले नाही. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी गायलेले वंदे मातरम मी नेहमीच गाईन, पण भाजपाने नंतर जोडलेले भाग मी गाणार नाही”, असंही ते म्हणाले.

खेडावाला हे काँग्रेसचे आमदार असल्याने भाजपा या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका जाणून घेऊ इच्छित आहे, याकडे लक्ष वेधले असता सीएलपी नेते चौधरी म्हणाले, “हा प्रकार विधानसभेत घडला आहे. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला, तर आम्ही तिथेच आमचे उत्तर देऊ.” दरम्यान, गुजरात भाजपचे प्रवक्ते अनिल पटेल यांनी खेडावाला यांच्या विधानसभेतील कृतीचा निषेधार्ह, गंभीर आणि बेकायदेशीर असा उल्लेख केला असून काँग्रेसला देशातील जनता चोख उत्तर देईल, असे म्हटले आहे.