अमेरिकेला जाऊन स्थायिक व्हावं असं कुणाला वाटत नाही? गुजरातच्या हितेशभाई सुथार यांनीही हे स्वप्न पाहिलं. दोन वर्षांपासून ते अमेरिकेतील वुस्टर शहरात वास्तव्य करत होते. या ठिकाणी असलेल्या इकोनो लॉज या मॉटेलमध्ये हितेशभाई त्यांची पत्नी हीनाबेन आणि २० वर्षांची मुलगी ईशानी या मॉटेलमध्ये राहात होते. मात्र या मॉटेलला आग लागली आणि आगीच्या धुरामुळे गुदमरुन या तिघांचाही मृत्यू झाला.
नेमकी काय घटना घडली?
हितेशभाई सुथार हे गुजरातमधल्या नडियाडचे होते. दोन वर्षांपूर्वी ते कुटुंबासह अमेरिकेला गेले होते. हितेशभाई हे याच मॉटेलमध्ये काम करत होते. या मॉटेलच्या एका खोलीत ते कुटुंबासह राहात होते. मात्र बुधवारी रात्री या मॉटेलला भीषण आग लागली. यावेळी हितेशभाई आणि त्यांचं कुटुंब झोपलं होतं. मॉटेलला जी आग लागली त्यामुळे धूर सगळीकडे पसरला. त्यांच्या खोलीतही धुराचे लोट पसरले. एकच हलकल्लोळ माजल्याने कुणीही बाहेर पडू शकलं नाही. या आगीमुळे जो धूर निर्माण झाला त्यात गुदमरुन आणि आगीत होरपळून या तिघांचा मृत्यू झाला. हितेशभाई यांनी मदतीसाठी फोन केला होता. त्यांना कुटुंबासह बाथरुममध्ये जा आणि तिथला शॉवर तसंच नळ सुरु करा आणि आतच थांबा असा उपाय सुचवण्यात आला होता. या तिघांनी तो उपाय केला मात्र हे कुटुंब वाचू शकलं नाही. कारण आग इतकी भयंकर होती की आगीवर नियंत्रण मिळवता मिळवता अग्निशमन दलाला बराच वेळ गेला. त्यावेळी बाथरुममध्ये गुदमरुन या तिघांचा मृत्यू झाला. हितेशभाई यांच्यासह कुटुंबही ठार झालं. ही बातमी नडियाद गावात पोहचताच सुथार कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
आग नियंत्रणात आणण्यासाठी बराच वेळ गेला आणि…
समोर आलेल्या माहितीनुसार रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्यानंतर ती वाढली आणि इमारतीत वेगाने पसरली. काही वेळातच आगीचे लोळ आणि धुराचे लोट वाढले. अग्निशमन दलास बोलवण्यात आलं. त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले पण आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्यामुळे ती नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाचा बराच वेळ गेला. या दरम्यान हितेश सुथार, हीना आणि त्यांची मुलगी ईशानी हे त्यांना देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे खोलीच्या बाथरुममध्येच होते. आगीचे लोळ आणि धुराचे लोट आपल्यापर्यंत पोहचणार नाहीत असं त्यांना वाटलं होतं. पण आग नियंत्रणात आणण्यासाठी बराच वेळ गेला ज्यामुळे धूर खोलीत कोंडला गेला आणि गुदमरुन हितेश सुथार, हीना सुथार आणि त्यांची मुलगी ईशानी यांचा मृत्यू झाला.
