horrific Rent Dispute Case in Gujarat : गुजरातच्या मोरबीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन हजार रुपयांचं घरभाडं देण्यास असमर्थ ठरलेल्या एका व्यक्तीने त्याच्या बायको आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची परवानगी घरमालकाला दिल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे संपूर्ण गुजरातमध्ये खळबळ माजली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
व्यवसायात यश न मिळाल्याने भाडं थकलं
भाडेकरूच्या पत्नीच्या आईने १ मे रोजी मोरबी सिटी ए डिव्हिजन पोलीस ठाण्यात तिच्या नवऱ्याविरोधात (भाडेकरू), घरमालक आणि त्याच्या नातेवाईकाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पीडितांच्या आई आणि आजीने सांगितलं की, संबंधित कुटुंब सहा महिन्यांपूर्वीच कामासाठी मोरबीला आले होते. तिथे राहण्याकरता त्यांनी दोन हजार रुपये भाड्याच्या करारावर ते घर घेतलं. परंतु, त्याचा व्यवसाय चांगला चालत नसल्याने त्यांचं थकीत भाडं वाढत गेलं. परिणामी घरमालकाने पैशांसाठी तगाद लावला.
अखेर, भाडेकरूने त्याच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची परवानगी घरमालकाला दिली. घटनेवेळी मुलगी अवघी १३ वर्षे ७ महिन्यांची होती. आरोपी मालकाने तक्रारदाराच्या मुलीवर आणि नातीवर स्वतःच्या घरी, भाड्याच्या घरात आणि टंकारा येथे वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, घरमालकाच्या नातेवाईकांनेही त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ५५ वर्षीय घरमालकाला आणि भाडेकरूला अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयातही हजर करण्यात आले होते. मोरबी शहर ए विभागाचे पोलीस निरीक्षक वाय. बी. जडेजा म्हणाले, भाडेकरू पतीला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो सध्या तुरुंगात आहे. घरमालकालाही तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. तर, या गुन्ह्यात मदत करणाऱ्या घरमालकाच्या नातेवाईकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, पीडितांची आणि आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. काही वैज्ञानिक पुरावेही गोळा करण्यात आले असून घरमालकाचे कुटुंबीय आणि गुन्ह्यात मदत करणारा सहआरोपी फरार आहे.
