गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या हार्दिक पटेलला भाजपने धक्का दिला. हार्दिक पटेलचे निकटवर्तीय वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांनी भाजपत प्रवेश केला आहे. आमचा लढा हा काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी नसून पाटीदार समाजाच्या न्यायासाठी आहे, असेही या नेत्यांनी सांगितले.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून बिहारच्या धर्तीवर गुजरातमध्येही भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारा हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर आणि दलित नेते जिग्नेश मेवानी आणि जदयूचे बंडखोर आमदार छोटू वासवा यांना काँग्रेसने महाआघाडीसाठी आमंत्रण दिले आहे.

शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी हार्दिक पटेलला उमेदवारी देण्याची तयारीही दर्शवली. हार्दिकला इच्छा असल्यास काँग्रेस त्याला उमेदवारी देण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले होते. गुजरातमध्ये १८२ पैकी १२५ जागा जिंकून काँग्रेस सत्तेवर येईल, असा दावाही सोळंकी यांनी केला. तर हार्दिक पटेलने भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या हार्दिक पटेलला हादरा बसला आहे. शनिवारी रात्री हार्दिक पटेलचे निकटवर्तीय वरुण आणि रेश्मा पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमच्या तीन मागण्या होत्या, भाजपने त्या मागण्या पूर्ण केल्याचे रेश्मा पटेल यांनी सांगितले. आम्हाला पाटीदार समाजाच्या न्यायासाठी लढा द्यायचा आहे, असे त्यांनी सांगितले.

हार्दिक पटेलच्या निकटवर्तीयांनी भाजपत प्रवेश केला असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकूर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शनिवारी संध्याकाळी ठाकूर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. २३ ऑक्टोबरला मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.