gujarat election 2022 first phase voting today in gujarat zws 70 | Loksatta

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर ‘आप’ने ८८ उमेदवार उभे केले आहेत.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकाऱ्यांकडून तयारी केली जात आहे.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचला या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार थांबला होता. गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान होणार आहे. तसे निवेदन राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून प्रसृत करण्यात आले आहे.

२०१७ मधील निवडणुकीत भाजपने या टप्प्यात ८९ पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या होत्या व एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर ‘आप’ने ८८ उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय ट्रायबल पार्टीसह (बीटीपी) इतर ३६ राजकीय पक्षांनी विविध जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ३३९ अपक्ष रिंगणात आहेत. गुजरातमधील एकूण चार कोटी ९१ लाख ३५ हजार ४०० पैकी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण १४,३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी तीन हजार ३११ केंद्र शहरी भागात व ११ हजार ०७१ केंद्र ग्रामीण भागात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

मद्यासंदर्भातील वक्तव्यानंतर भाजप उमेदवाराविरोधात तक्रार

पालनपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपच्या एका उमेदवाराने मद्याची खुलेआम विक्री करता येऊ शकते, असे कथित वक्तव्य केले. त्यामुळे या उमेदवाराविरोधात ‘एफआरआय’ दाखल करण्यात आला आहे. गुजरातमध्ये मादक पदार्थ तयार करणे, बाळगणे, विक्री आणि वापरास बंदी आहे. २६ नोव्हेंबर रोजी एका सभेची चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बनारसकांठा जिल्ह्यातील दांता मतदारसंघातील भाजप उमेदवार लाटूभाई पारघी यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  मद्य खुलेआम विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल, असे पारघी यांनी महिलांच्या एका गटासमोर कथित वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 02:46 IST
Next Story
BREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू