अहमदाबाद :गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. दक्षिण गुजरात आणि कच्छ- सौराष्ट्र प्रदेशातील ८९ मतदारसंघांत मतदान झाले असून मतदानाची अंदाजे टक्केवारी ६०.२३ आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.  २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यात ६६.७५ टक्के मतदान झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदान सकाळी ८ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजता संपले. मात्र काही मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपूर्वी मतदार आले आणि रांगेत उभे असल्याने तिथे मतदान करण्याचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ७८८ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. काही घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेलमध्ये (व्हीव्हीपीएटी) बिघाड झाल्याने काही ठिकाणी मतदान थांबवण्यात आले. मात्र सदोष युनिट बदलण्यात आल्यानंतर मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

तापी जिल्ह्यात सर्वाधिक ७२.३२ टक्के मतदान झाले. या आदिवासीबहुल जिल्ह्यात व्यारा आणि निझर हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. ६८.०९ टक्के मतदानासह नर्मदा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सौराष्ट्रमधील भावनगरमध्ये सर्वात कमी ५१.३४ टक्के मतदान झाले. नवसारी, डांग, वलसाड आणि गीर सोमनाथ या चार जिल्ह्यांतही ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले.

काही ठिकाणी गोंधळ..

काही मतदार केंद्रांवर प्रतिस्पर्धी गटांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. जामनगर जिल्ह्यातील जामजोधपूर तालुक्यातील ध्राफा गावात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र नसल्यामुळे स्थानिकांनी विरोध केला. यापूर्वी नेहमीच स्वतंत्र मतदान केंद्रे उभारण्यात आल्याचा दावा करत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. जुनागडमध्ये महागाईचा निषेध करण्यासाठी खांद्यावर गॅस सिलिंडर घेऊन मतदान केंद्राकडे निघालेल्या काँग्रेस नेत्याला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. असा निषेध इतरही अनेक ठिकाणी पाहायला मिळाला.

मिशा वाढवणाऱ्यांना भत्ता द्या!

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी साबरकांठा जिल्ह्यातील हिमतनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे असलेले मगनभाई सोळंकी हे उमेदवार सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. तब्बल पाच फूट लांबीच्या मिशा असलेल्या मगनभाईंनी मिशा वाढवणाऱ्यांना भत्ता द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. ५७ वर्षीय मगनभाई २०१२ मध्ये लष्करातून मानद लेफ्टनंट म्हणून सेवानिवृत्त झाले. २०१७ ची विधानसभा आणि २०१९ची लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली आहे. ‘‘जो कोणी मिशी वाढवतो, त्याच्या देखभालीसाठी सरकारने काही रक्कम द्यावी. लष्करात मला मिशा राखण्यासाठी विशेष भत्ता मिळत होता. माझ्या मिशा हा माझा अभिमान असून त्यामुळे मला गर्दीत वेगळेपणा येतो, असे सोळंकी म्हणाले. या जागेवर निवडून आल्यास गुजरातमधील तरुणांना मिशा वाढवण्यास प्रेरित करणारा कायदा आणावा, अशी विनंती राज्य सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat elections 2022 60 percent turnout recorded in phase 1 zws
First published on: 02-12-2022 at 02:19 IST