Gandhinagar Pregnant Woman Murder Case : गुजरातमधील गांधीनगरमध्ये गर्भवती महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या पतीसह त्याच्या कथित प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रमेशजी ठाकोर (वय ३३) याने पत्नी संगीता हिचा रुमालाने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वर्षा नरसिंग परगी या महिलेलाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या, संगीता हिचा मृत्यू औषधांच्या दुष्परिणामांमुळे झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णालयात तिच्या गळ्यावर खुणा दिसल्याने नातेवाइकांना संशय आलाआणि त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

गर्भपातास नकार दिल्याने वाद

गांधीनगरचे पोलीस अधीक्षक रवी तेजा वासमसेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित याला आधीच चार मुले आहेत. पत्नी पुन्हा गर्भवती झाल्यानंतर त्याला गर्भपात हवा होता, मात्र संगीताने त्यासाठी नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून हत्या झाल्याचा आरोप आहे.

लायब्ररीत जुळले प्रेमसंबंध

तक्रारीनुसार, रोहित आणि संगीताचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार मुले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लायब्ररीत जात असताना रोहितची वर्षा परगीशी ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा आरोप आहे. दोघे एकत्र राहू लागल्याचेही तक्रारीत नमूद आहे. संगीता गांधीनगरला आल्यानंतर रोहितला वर्षाशी फोनवर बोलताना पाहिले. यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येते.

रुमालाने गळा आवळल्याचा आरोप

संगीताच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी तिच्या सासऱ्यांनी तिला औषधांच्या दुष्परिणामांमुळे गांधीनगर सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. तिच्या गळ्यावरील खुणांमुळे संशय बळावला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहितने चौकशीदरम्यान पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारीत नमूद कथित कबुलीनुसार, रोहित आणि वर्षा यांनी मिळून रुमालाने संगीताचा गळा आवळला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.