गुलबर्ग सोसायटी जळीतकांडप्रकरणातील दोषी आणि विश्व हिंदू परिषदेचा नेता अतुल वैद्य याला गुजरात हायकोर्टाने जामीन मंजूर केला. जळीतकांडाप्रकरणी अतुल वैद्यला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणातील दोषीला जामीन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुजरातमध्ये गोधरा हत्याकांडानंतर २००२ मध्ये दंगली झाल्या होत्या. अहमदाबादमध्ये दंगलखोरांनी गुलबर्ग सोसायटी या मुस्लीमबहुल भागाला लक्ष्य केले होते. या सोसायटीला घेराव घालून पेटवून देण्यात आले होते. या जळीतकांडात ३९ जण ठार झाले होते तर ३१ जण बेपत्ता झाले होते. याप्रकरणात गुजरातमधील विशेष कोर्टाने गेल्या वर्षी २३ जणांना दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली होती. यामध्ये विश्व हिंदू परिषदेचा नेता अतुल वैद्यचाही समावेश होता. अतुल वैद्यला सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. वैद्यने जामिनासाठी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश अभिलाशा कुमारी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. वैद्यने विशेष न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले असून या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्यांनी आधीपासूनच एक वर्ष तुरुंगात काढला आहे. तसेच पुराव्यांच्या आधारे त्यांना जामीन मंजूर करत असल्याचे हायकोर्टाने सांगितले.

गुलबर्ग जळीतकांडात ठार झालेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचाही समावेश होता. जाफरी यांच्या पत्नी झाकिया यांनी या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी लढा दिला होता. या जळीतकांडाप्रकरणी ३३८ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.