सोमनाथ मंदिर परिसरात मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा गुजरात सरकारचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. यासंदर्भातील सविस्तर निकाल अपेक्षित आहे.
ऑगस्ट महिन्यात गुजरात सरकारने सोमनाथ मंदिर परिसरात मांसाहारी पदार्थांची विक्री, साठवणूक, विक्री तसंच तयारी यावर बंदी घातली होती. सहा हॉटेलचालकांनी या बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली. जेएम रेस्टॉरंट, ख्वाजा हिंदुस्तान रेस्टॉरंट, न्यू गुलाब, किस्मत आणि ताज यांचा समावेश होता.
न्यायालयाने बंदीचा आदेश रद्द ठरवताच राज्य सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी गुजरात राज्य सरकारने सोमनाथ मंदिर परिसरात मांसाहार बंदीच्या निर्णयाचं कठोर शब्दात समर्थन केलं होतं. सोमनाथ मंदिराचं धार्मिक महत्त्व आणि भाविकांची प्रचंड संख्या लक्षात घेता या परिसरात मांसाहार विक्री किंवा तयार करणे योग्य नाही अशी भूमिका गुजरात सरकारने घेतली होती.
सोमनाथला यंदाच्या वर्षी १.२ कोटी भाविकांनी भेट दिली. हृषिकेश, हरिद्वार, अमृतसर, मथुरा-वृंदावन या धार्मिक शहरांमध्ये मांसाहार विक्री तसंच तयार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोमनाथकडे सर्वसामान्य व्यावसायिक केंद्र म्हणून पाहण्यात येऊ नये असं आवाहन गुजरात सरकारने न्यायालयासमोर केलं होतं. मांसाहारासंदर्भात बंदी ही संपूर्ण सोमनाथ शहरासाठी नसून फक्त मंदिर परिसरासाठी लागू आहे हेही राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं.
रेस्टॉरंट मालकांच्या वतीने ए.एल. मन्सुरी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारला अशा पद्धतीने मांसाहार विक्री तसंच तयार करण्यावर बंदी घालण्याचा अधिकारच नाही असं मन्सुरी यांनी सांगितलं. याकरता त्यांनी गुजरात पोलिस कायद्याचा दाखला दिला. मांसाहार विक्री केंद्र गेली अनेक दशके या भागात कार्यरत आहेत. या हॉटेलांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीचं जेवण उपलब्ध करून दिलं जातं. मांसाहारासंदर्भात बंदी घातली गेली तर शेकडो लोकांच्या रोजीरोटीवर गदा येईल. मांसाहारी पदार्थ विकणे, तयार करणे यामुळे परिसरातील शांततेचं उल्लंघन झालेलं नाही. कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. धार्मिक तेढ किंवा अशांतता निर्माण झालेला नाही. त्यामुळे अशी बंदी घालण्यासाठी कोणतंही सबळ कारण राज्य सरकारकडे नाही असा युक्तिवाद मन्सुरी यांनी केला.
