Lion Attack in Gujarat: गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील गरजीया गावात सोमवारी सकाळी एका सिंहाने एका व्यक्तीला जखमी केल्यानंतर वनविभागाने त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये, सिंह एका व्यक्तीच्या अंगावर बसलेला दिसत आहे. आजूबाजूला नागरिकांचा किंचळण्याचा आवाज येत आहे. कलुभाई परमार असं या जखमी व्यक्तीचं नाव असून, ते गरजीया गावचे रहिवासी आहेत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालिताना वन्यजीव श्रेणी कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, “५ जुलै रोजी सोनपरी गावच्या धारवाला भागात एका जंगली सिंहाने शिकार केली होती. त्यानंतर हा सिंह गरजीया गावच्या महसुली क्षेत्रात पोहोचला, हा त्याच्या कायमस्वरूपी येण्या-जाण्याचा मार्ग आहे.”

वन्यप्राण्यांना त्रास देऊ नये

निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “त्यानंतर, (६ जुलैची) सकाळची वेळ असल्याने गावकऱ्यांची वर्दळ सुरू झाली होती. सिंहाला पाहताच लोकांनी आरडाओरडा सुरू केला, यामुळे सिंहाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यात एक व्यक्ती जखमी झाली.” या निवेदनात वन अधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की त्यांनी वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये आणि ते दिसल्यास त्यांना स्वतः हाकलून लावण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.

आशियाई सिंहांचे एकमेव नैसर्गिक निवासस्थान असलेल्या गुजरातच्या सौराष्ट्र भागात गेल्या काही महिन्यांत या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. सिंहाने माणसाचा जीव घेतल्याची किंवा जखमी केल्याची ही पाचवी घटना आहे. गेल्या महिन्यात अमरेली जिल्ह्यात एका सिंहाने पाच वर्षांच्या मुलाला ठार केलं होतं, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांची भेट घेताना गुजरातचे वन आणि पर्यावरण मंत्री अर्जुन मोढवाडिया यांनी सांगितलं होतं की, मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी सरकार दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही उपाययोजना करेल. २०२५ च्या सिंह जनगणना अंदाजानुसार, गुजरातमध्ये ८९१ सिंह आहेत.