Seema Haider : २०२३ मध्ये पाकिस्तानातून तिच्या मुलांबरोबर बेकायदेशीरपणे नेपाळमार्गे भारतात पळून आलेली सीमा हैदर सध्या तिच्या जोडीदाराबरोबर भारतात राहत आहे. दरम्यान ग्रेटर नोएडा पोलिसांनी सीमा हैदरच्या घरात घुसखोरी केल्याप्रकरणी शनिवारी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सीमा हैदरची सासू रितू देवी यांनी राबुपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शनिवारी एक व्यक्ती त्यांची बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तो दरवाजा उघडता येत नसल्याने ओरडू लागला. ज्यामुळे घरात असलेल्या मुलांसह सर्वजण घाबरले आणि पोलिसांना कळवण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.
“आम्ही गुजरातमधील सुरेंद्रनगरचा रहिवासी असलेल्या तेजस जानी या व्यक्तीला अटक केली आहे. आम्हाला संशय आहे की तो कुठल्यातरी मानसिक आजाराने ग्रस्त आहे,” असे नोएडा पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी असेही सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमा हैदरला सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात होत्या. त्यानंतर तिच्या घराबाहेर एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आला होता. या पोलीस कर्मचाऱ्याने या व्यक्तीला अटक केली.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर जानी याने सांगितले की त्याला सीमा हैदर आणि तिच्या पतीने काळी जादू केल्याचा बदला घ्यायचा होता. “माझे वडील एका वर्षापासून बेपत्ता आहेत आणि तीन वर्षांपूर्वी माझ्या आईचे मेंदूच्या कर्करोगाने निधन झाल्यानंतर सीमा हैदर आणि तिचा जोडीदार सचिन मीना माझ्यावर काळी जादू करत आहेत ज्यामुळे मी तणावात आहे,” असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानी हा २ मे रोजी गुजरातहून रेल्वेने निघाला आणि इंटरनेटवर सीमा हैदरचा पत्ता शोधून तिथे पोहचला. “सीमा आणि तिच्या कुटुंबियांचे फोटो देखील आम्हाला त्याच्या फोनमध्ये सापडले आहेत,” असेही पोलिसांनी सांगितले.
“घटनेच्या वेळी सीमा ही घराच्या छतावर होती आणि उरलेले सर्व सदस्य हे घरात होते,” असे राबुपुराचे एसएचओ सुजीत उपाध्याय यांनी सांगितले.
आम्हाला न्यायालयाची परवानगी मिळाली की त्याची आज वैद्यकिय चाचणी करून त्याला कोणता मानसिक आजार आहे का याची माहिती मिळवली जाईल असेही उपाध्याय यांनी सांगितले.
चौकशीदरम्यान जानी याने पोलीसांना सांगितले की, तो जोडप्याचा चाहता असूनत्यांना भेटण्यासाठी आणि पाहाण्यासाठी आला होता. “मी घरात घुसण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी फक्त गेटच्या बाहेरून त्यांच्या नावाने हाका मारत होते. तेथे पोलीस कॉन्स्टेबल आधीच तैनात होता, तर मग मी का घुसखोरी करेल?,” असे त्याने पोलिसांना सांगितले.
एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या विनंती करत सांगितले की, पोलिसांना त्याच्या फोनमध्ये या जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. “सचिन आणि सीमा यांना भेटल्यानंतर तो काशी विश्वनाथ येथे जाण्याच्या विचारात होता. त्याने एमकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे ,” असे अधिकार्याने सांगितले.